Breaking News

विजेवर चालणार्‍या 5595 बसेसला अवजड मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली
अवजड उद्योग मंत्रालयाने देशभरातील 64 शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणार्‍या 5595 बसेसला मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरण पूरक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बस चालवण्यासाठी मंत्रालयाने राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या, स्मार्ट सिटी आणि विशेष दर्जा असलेल्या शहरांमधून स्वारस्यपत्रे मागवली होती. 26 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडून 14988 ई- बस चालवण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांची छाननी केल्यावर प्रकल्प अंमलबजावणी आणि मंजुरी समितीच्या सल्ल्याने सरकारने 5095 बस चालवण्याला मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वेला जोडण्यासाठी 100 आणि शहरांतर्गत वाहतुकीसाठी 400 बस दिल्या जाणार आहेत. या बस त्यांच्या कंत्राट कालावधीत सुमारे 4 अब्ज किलोमीटर धावण्याची आणि सुमारे 1.2 अब्ज लीटर इंधनाची बचत करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 2.6 दशलक्ष टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनाला आळा बसणार आहे.