Breaking News

पूरग्रस्तांना कर्जमाफी, हेक्टरी 60 हजार मदत द्या

काँगे्रसच्या शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई
राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी 60 हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली राज्य सरकारकडे बुधवारी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले असताना दुसरीकडे मराठवाड्यात पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी मदत जाहीर करावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापुराला केंद्र सरकारने अद्याप एल-3 आपत्ती म्हणून जाहीर केले की नाही, याबाबत राज्य सरकारने स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मदत मिळालेली नाही. तसेच अपेक्षेप्रमाणे मदतकार्य झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष या संकटकाळात पूर्णपणे सरकारसोबत राहून मदतकार्यात अग्रेसर राहिला असून, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिवसरात्र पूरग्रस्तांना मदत करत आहेत. पूनर्वसनाचा गंभीर प्रश्‍न अजूनही कायम आहे. तसेच दुस-या बाजूला मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पूरग्रस्त आणि दुष्काळपीडितांच्या हिताकरिता काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या. पूरग्रस्त भागात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने ऊस, काजू, आंबा, भातशेती आणि इतर पिकांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी दिली जावी, त्याचबरोबर शेतजमीन खरवडून गेली असून, शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 60 हजार रू. भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. पूरग्रस्त भागात पशुधनाची मोठी हानी झाली आहे. परंतु, सरकारकडून पशुधनाच्या नुकसानासाठी जाहीर झालेली मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे पशुधन गमावलेल्या शेतकर्‍यांना सरकारने पशुधन उपलब्ध करून द्यावेत. विमा कंपन्यांना नुकसानभरपाईचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत तसेच इलेक्ट्रीक मीटर व कृषीपंपाकरिता देखील मदत सरकारने द्यावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहेत. या शिष्टमंडळात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.