Breaking News

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

अहमदनगर/प्रतिनिधी
“राज्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही प्रश्‍न निकाली निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ऑगस्ट क्रांतिदिनापासून युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ग्रामसेवकांनी राज्यभरात जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन केले. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे राज्यभरातील 22 हजार ग्रामसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत ठोस कार्यवाहीशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामसेवकांनी केला असून संतापाचा कडेलोट होण्याआधी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी ढाकणे यांनी केली.
दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामसेवकांच्या आंदोलनाची दखल घेत बुधवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. ग्रामसेवकांच्या या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानेही पाठिंबा जाहीर केला आहे.
ग्रामसेवकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याची भावना आहे. प्रश्‍न सोडवण्याबाबत मंत्र्यांपासून अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनीच आश्‍वासने दिली. अपवाद वगळता सर्वच आश्‍वासने हवेत विरल्यामुळे घोर फसवणूक झाल्याची भावना ग्रामसेवकांमध्ये तयार झाली आहे. 21 ऑगस्टपर्यंत विविध मार्गांनी ग्रामसेवक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधणार असून सरकारला जाग न आल्यास 22 ऑगस्टपासून राज्यव्यापी कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती होणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक अर्हता बदलून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका कराव्यात, 2011 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढ करावीत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर कराव्यात, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ व एक गाव एक ग्रामसेवक धोरण राबवावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावित, आदी मागण्या धरणे आंदोलनावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सुनील नागरे, राजेंद्र पावसे, बाळासाहेब आंबरे, एकनाथ आंधळे, अशोक नरसाळे, सुभाष गर्जे, मधुकर दहिफळे, रामदास डुबे, युवराज पाटील, अहमद शेख, रमेश बांगर, सारीका वाळूंज, राणी वाघ, राणी वाके, कमल पावसे, मीनाक्षी काणे, अश्‍विनी कहाणे, रोहिणी नवले आदी सहभागी झाले होते.