Breaking News

कर्जत तालुक्यात दोन लाखांचा गुटखा पकडला

अहमदनगर/प्रतिनिधी
 कर्जत तालुक्यातील माहिंजळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात अवैध गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ व मावा तयार करण्याचे मशीन असा एकूण दोन लाख 18 हजार 320 रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी कर्जत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कर्जत तालुक्यातील माहिंजळगाव येथे दोन इसम गुटखा बंदी असताना गुटखा, पानमसाला इत्यादी तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या विक्री करत आहे. यावर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ.बाळासाहेब मुळीक, संभाजी कोतकर, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विश्‍वास बेरड, पो.कॉ.कमलेश पाथरुट यांना त्या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. या पथकांनी सहायक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग यांना बरोबर घेऊन माहिंजळगाव येथे छापा टाकला. याठिकाणी अवैध गुटखा विक्री करणारे महेंद्र आण्णा जाधव (वय-30) व झुंबर नामदेव भिसे (वय-51) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुटखा, पानमसाला व मावा तयार करण्याचे मशीन असा एकूण 2 लाख 18 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पो.कॉ.कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.