Breaking News

सासूरवाडीला तरी शाह यांनी मदत करावी

बाळासाहेब थोरात यांचा उपरोधिक टोला; पाहणीवर न भागविण्याचा सल्ला

मुंबई / प्रतिनिधी
कोल्हापुरातला महापूर ओसरू लागला आणि राजकारणाला आणखी वेगात सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चांगलेच धारेवर धरले आहे. कोल्हापूर ही शाह यांची सासुरवाडी आहे. त्यामुळे तरी त्यांनी जास्त मदत करावी. फक्त हवाई पाहणी करू नये, असा टोलाही त्यांनी शाह यांना लगावला आहे.

शाह यांनी काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर, सांगली, कराड आणि बेळगावच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती. त्यावर थोरात यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली. ते म्हणाले, की पुराची परिस्थिती गंभीर आहे. आता पूर ओसरल्यानंतर संकटे मोठी आहेत. असे असलं तरी प्रशासन अद्याप गतीने काम करीत नाही. त्यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पहाणीपेक्षा अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडले असते, तर संकट कमी झाले असते.
मोठे नुकसान झाले तिथे केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी. पाच हजार रुपयांच्या मदतीने काहीच होणार नाही. त्यांचे पुर्नवसन होणे गरजेचे आहे. संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. जनावरांसाठी मदत दिली पाहिजे. इचलकरंजीतील कापड उद्योजकांना मदत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागात काँग्रेस कंट्रोल रुम तयार करणार असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिथे थांबतील असेही थोरात यांनी सांगितले.
ःःःःःःः..
चौकट
संकटात सरकार जनतेबरोबर नाही
ःःःःःःःःःः..
संकटाचं गांभीर्य सरकारला लक्षात आले नाही. प्रशासन पातळींवर धोरण फसले आहे. पालकमंत्र्यांचे लक्ष नव्हतं. संकटात जनतेबरोबर राहिले पाहिजे, ते काम सरकारने केले नाही, असा आरोप थोरात यांनी केला.