Breaking News

भारत, चीनचे फायदे बंद करा

ट्रम्प यांचे जागतिक व्यापार संघटनेला साकडे

वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणार्‍या लाभावर टीका केली आहे. जागतिक व्यापार संस्थे (डब्ल्यूटीओ) ला विकसनशील देशांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विकसनशील देशांप्रमाणे लाभ देणे थांबवले पाहिजे. या दोन्ही देशांना जागतिक व्यापार संघटनेतून मिळणारे फायदे तात्काळ बंद करायला हवेत, असे साकडे ट्रम्प यांनी घातले आहे.

ट्रम्प अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात करामुळे भारतावर नेहमीच टीका करत असतात. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर दंडात्मक कर आकारल्यानंतर चीननेही ट्रम्प यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. कोणत्या देशाला कशा प्रकारे विकसनशील देशाचा दर्जा मिळतो, हे जागतिक व्यापार संघटनेने स्पष्ट करावे, असे ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. चीन, तुर्कस्थान आणि भारतासारख्या देशांना मिळणारे लाभ बंद करण्याच्या उद्देशानेच ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. तसेच कोणतीही विकसित अर्थव्यवस्था जागतिक व्यापार संघटनेतूनफायदा मिळवत असल्यास त्या देशावर दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकारही ट्रम्प यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधीं(यूएसटीआर) ना बहाल केले आहेत.

पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, की भारत आणि चीन या आशियातल्या दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. ते आता विकसनशील देश राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना जागतिक व्यापार संघटनेचे लाभ मिळू नयेत. विकसनशील देशांना मिळणार्‍या सवलतींचा फायदा हे देश उठवत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे नुकसान होते आहे. जागतिक व्यापार संघटना अमेरिकेबरोबर निष्पक्षरीत्या व्यवहार करणार आहे.