Breaking News

निरोपाच्या कसोटीचा गेलचा प्रस्ताव फेटाळला

कसोटी संघातून डच्चू

नवी दिल्ली
युनिव्हर्सल बॉस, स्टार विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला भारताविरुद्ध निरोपाचा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार नाही, हे शनिवारी स्पष्ट झाले. विंडीज निवड समितीने 13 सदस्यीय संघ जाहीर करत असताना त्यात ख्रिस गेलला वगळण्याचा निर्णय घेतला तर कॉर्नवलला पदार्पणाची संधी दिली. उभय संघातील पहिली कसोटी दि. 22 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. रहकीम कॉर्नवल हा लीवर्ड आयलंडस्चा फिरकी गोलंदाज-अष्टपैलू आहे. कॉर्नवलने 2014 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट पदार्पण केले आणि 55 सामन्यात 260 बळी व 2224 धावांचे योगदान त्याने दिले आहे. अवघ्या सहा आठवडयातच 40 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या ख्रिस गेलने किंग्स्टन येथे घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सांगता करण्याची संधी मिळावी, अशी विनंती केली होती. पण, रॉबर्ट हेन्स यांच्या नेतृत्वाखालील विंडीज निवडकर्त्यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. ख्रिस गेल सध्या कसोटी संघातून पूर्णपणे बाहेर आहे, ही यामागील पार्श्‍वभूमी महत्त्वाची आहे. ख्रिस गेलने 2014 साली बांगलादेशविरुद्ध आपली शेवटची कसोटी खेळली आहे. सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत पहिल्या लढतीत गेल अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसून आला होता. माजी दिग्गज जलद गोलंदाज कर्टली ऍम्ब्रॉसने यापूर्वी गेलला कसोटी संघात घेण्यास विरोध दर्शवला होता. ख्रिस गेल वनडे किंवा टी-20 खेळणार असेल तर त्यात काहीच हरकत नाही. पण, कसोटी क्रिकेटचा मुद्दा असेल तर किमान मी तरी त्याला संधी देणार नाही, असे ऍम्ब्रॉसने यापूर्वी म्हटले होते. ‘गेलने मागील 5 वर्षात एकही कसोटी खेळली नाही. अशा परिस्थितीत फक्त एका कसोटी सामन्यासाठी त्याला संघात घेणे हे एक पाऊल मागे येण्यासारखे आहे’, असा दावा ऍम्ब्रॉसने त्यावेळी केला होता.

विंडीज संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), क्रेग बेथवेट, डॅरेन ब्रेव्हो, शॅमह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवल, शेन डॉरिच (यष्टीरक्षक), शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेतमेयर, शाय होप, किमो पॉल, केमर रॉश.