Breaking News

भीमा नदीवरील पुलाचे कठडे जीर्ण

पुलावरील प्रवास बनला धोकादायक ; दुरुस्तीची प्रतीक्षा

कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील खेड-भिगवण मार्गावर भीमा नदीच्या पुलावरील कठडे जीर्ण झाल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. चार दशकांपूर्वी बांधलेल्या या पुलाची अद्यापपर्यंत कसलीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या राज्यमार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी पूलाचे कठडे भक्कम असण्याची गरज आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षात कठड्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. भग्न झालेल्या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
  पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा हा पूल आहे. या पुलावरून जड वाहनांची नियमित वाहतूक सुरू असते. खेड भागातून नियमित भिगवण, बारामतीला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पुलाची लांबी अधिक असल्याने जड वाहने जाताना पूलाला मोठे हादरे बसतात. कठड्यांचे काँक्रीट जीर्ण झाले असून हादर्‍यांनी त्याचे तुकडे पडत आहेत. कठड्यातील लोखंडी गज उघडे पडल्याने ते गंजून गेले आहेत. एक-दोन ठिकाणी वाहने धडकल्याने कठडे कोसळले आहेत. त्यामुळे हा पूल प्रवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. दुचाकी वाहनाची धडक बसली तरी कठडे कोसळून वाहन नदीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.