Breaking News

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र

मुंबईचे मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक

बालाकोट एअरस्ट्राईक करणार्‍या 5 वैमानिकांना शौर्यपदकं 

नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून तब्बल 14 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्र पुरस्कार तर, मुंबईचे मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना पदक (शौर्य) पदक जाहीर करण्यात आले आहे. बेळगावचे प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते. अभिनंदन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. बुधवारी शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली. 15 ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनी त्यांना शौर्य पदक प्रदान करण्यात येणार आहे. अभिनंदन यांच्या व्यतिरिक्त स्क्वॉड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मिंती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच कॅप्टन महेशकुमार भुरे यांना शौर्य चक्र तर, मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवळकर, सीआरपीएफ कमांडेंट हर्षपाल सिंह यांना कीर्तीचक्र, कॅप्टन प्रतीक रंजगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. बालाकोट एअरस्ट्राईक करतांना महत्वाची भूमिका बजावणार्‍या पाच वैमानिकांना शौर्यपदकं जाहीर करण्यात आले आहेत. पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी 27 फेब्रवारी रोजी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या विमानांना भारतीय हवाई दलाने परतवून लावले होते. यात पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 हे विमान अभिनंदन यांनी अचूक मारा करीत पाडले होते. मात्र, यावेळी अभिनंदन वर्धमान यांचे लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत अपघातग्रस्त झाले होते.पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही त्यांनी आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. शत्रू राष्ट्राला देशासंबंधीची कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. त्यानंतर ते सुखरुप मायदेशात परतले होते. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकता असल्याने अलीकडेच त्यांची श्रीनगर येथील हवाई तळावरुन पश्‍चिम सेक्टरमधील भारत-पाक सीमेवरील दुसर्‍या महत्वाच्या हवाई तळावर बदली करण्यात आली आहे. मात्र, हा हवाई तळ नक्की कुठला आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे सीमारेषेवर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना खात्मा केला. परंतु, या चकमकीत बेळगाव जिल्ह्यातील जवान प्रकाश जाधव शहीद झाले. शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र जाहीर करण्यात आले आहे.