Breaking News

महाराष्ट्र रडतोय, आमदार नाचतोय!

ठाणे / प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ओढवलेल्या पूरस्थितीने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सावटाखाली असताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरमध्ये आपल्या समर्थकांसोबत एका गाण्यावर ठेका धरला. उत्तर भारतीय मोर्चा आयोजित ‘कजरी महोत्सव’ या कार्यक्रमात आ. मेहता दंग आहेत.

महापौर डिंपल मेहता तसेच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी कजरी महोत्सवाला हजेरी लावली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. धान्य, पाणी, जीवानश्याक वस्तूंसाठी मदतीची हाक दिली जात असताना कजरी महोत्सवात उत्तर भारतीय मोर्चाचे पदाधिकारी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात व्यस्त आहेत.
भाजप आमदाराच्या या कृतीचा काँग्रेस आणि मनसेने निषेध केला आहे.

मीरा भाईंदरच्या भाजप पदाधिकार्‍यांनी केलेले कृत्य हे काही नवीन नाही. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे याचे पार्थिव आले होते, तेव्हासुद्धा हेच आमदार महाशय वाढदिवसाच्या पार्टीत रंगले होते, अशी टीका काँग्रेस प्रवक्ता (मीरा भाईंदर) अंकुश मालुसरे आणि मनसे शहर अध्यक्ष (मीरा भाईंदर) प्रसाद सुर्वे यांनी केली आहे.