Breaking News

महापरीक्षा पोर्टलवर विद्यार्थ्यांचा आक्षेप

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांचा तहसीलवर मोर्चा

श्रीगोंदे/प्रतिनिधी
 राज्यशासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरु केली आहे. यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी श्रीगोंदे शहरातून मोर्चा काढत आक्षेप नोंदविले. या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.
 राज्य सरकारने तलाठी, ग्रामसेवक, पोलिस भरती, अभियांत्रिकी, आरोग्य विभाग, महावितरण कर्मचार्‍यांची भरती ई-महापोर्टलच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली आहे. 2 ते 28 जुलै दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेत पारदर्शकतेचा व विश्‍वासहर्यता अभाव दिसून आला. व तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचे संशय स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांनी व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व अमोल मांडे, शिवाजी फंड, राहुल मेहेत्रे, रुपाली खेडकर, अविनाश आघाव, प्रशांत पवार, उमेश दिवटे, गणेश खामकर, गणेश जगताप, विकास शिवले, तुकाराम हिरवे यांनी केले. नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले.
 यावेळी प्रा.योगेश मांडे, प्रा.कानिफनाथ उगले, राहुल साळवे, प्रा.संतोष धुमाळ, पांडुरंग शेलार यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांची व्यथा मांडली. यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.