Breaking News

बाजार समिती कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

अहमदनगर/प्रतिनिधी
“राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव ते शिपाई पदापर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून बाजार समिती कर्मचार्‍यांचे सुरु असलेले आंदोलन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या  लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले असून 2 आठवडे नगरसह राज्यातील बाजार समित्यांतील ठप्प झालेले कार्यालयीन कामकाज बुधवारी (दि.14) दुपारपासून सुरळीत झाले’’ अशी माहिती नगर बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे यांनी दिली.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव ते शिपाई पदापर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कृती समितीच्या वतीने 27 जुलैपासून धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितीतील सर्व कर्मचारी दि.1 ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजेवर गेले होते. कर्मचार्‍यांच्या या आंदोलनामुळे बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज पूर्णत: ठप्प झाले होते.
या कर्मचार्‍यांनी बाजार समिती कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करत धरणे आंदोलन केले. तसेच आमदार, मंत्री यांना निवेदने दिली होती. शासन याची दखल घेत नसल्याने मंगळवारी मुंबईत धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, कृती समितीचे नीलेश दिंडे, पुरुषोत्तम खंडागळे, शिवाजी मगर यांच्या शिष्टमंडळास पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चर्चेला बोलावून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बाजार समिती कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिले. त्यामुळे बाजार समिती कर्मचार्‍यांनी गेल्या 15 दिवसांपासून सुरु केलेले आंदोलन स्थगित करत कार्यालयीन कामकाज सुरु केले असल्याचे संजय काळे यांनी सांगितले.