Breaking News

आदिवासी परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन आवश्यक

अहमदनगर/प्रतिनिधी
“आदिवासी समाज हा खर्‍या अर्थाने निसर्गपूजक असून मूलनिवासी आहे. जगभरात या समाजाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन बदलणे काळाची गरज बनली आहे. ‘युनो’ने ठराव करून डिसेंबर 1994 पासून जगभरात 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास सुरूवात केली. आदिवासी बोली, संस्कृती, परंपरा, साहित्य, देव-देवतांचा गौरव झाला पाहिजे. आदिवासी हे निसर्गपूजक व मानवतावादी आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. काळाच्या ओघात या संस्कृतीवर खूप अतिक्रमणे होत आहेत. या संस्कृतीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. ते थोपविण्यासाठी आदिवासी बांधवांनी एक होणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर आधुनिकतेची कास धरत शिक्षण घेत आदिवासी समाजबांधवांनी प्रगती साधली पाहिजे. नव्या पिढीपर्यंत आधुनिक ज्ञान पोहचविताना आपली मूळ संस्कृतीही रूजवली पाहिजे’’, असे प्रतिपादन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. नितीन तळपाडे यांनी केले.
नगरमधील आदिवासी सेवा संघ, आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणूक, विद्यार्थी गुणगौरव समारंभ घेण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.तळपाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेतन पथक अधीक्षक संजय गंभिरे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सुगी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. संदीप कोकाटे, साखर संचालक ज्ञानेदव मुकणे, उद्योजक नामदेव भांगरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, चिंतामण आंधळे, रखमाजी मुठे, हिरा मुठे, सोमनाथ लेंभे, रंजना लेंभे, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विलास भारमल, जगन्नाथ सावळे, संतोष नवले, हिरामण पोपेरे, हनुमंता सोनवणे, शिवानंद भांगरे, सुरेश शेंगाळ, निवृत्ती भांगरे, रामनाथ कचरे, गंगाधर धोंगडे, शर्मिला देशमुख आदी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी संस्कृती, आदिवासी बोली, आदिवासी साहित्य याचे दर्शन घडविण्यात आले. आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती, आदिवासी हेच खरे निसर्गपूजक, पर्यावरण, जंगले वाचवा, असे संदेश देत शहरातील प्रमुख मार्गांवरुन मिरवणूक मार्गस्थ झाली. नगरमधील शासकीय आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनी पारंपरिक पावरा नृत्य सादर करुन मुलींनी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. वसतिगृहातील मुलांच्या झांजपथकानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात आदिवासींमधील सर्व जमातींनी एकत्र येवून भविष्याचा वेध घेत उत्कर्ष साधण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमास नगर शहरासह जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आदिवासी युवा संघटना, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन विद्या देशमुख व सुरेश शेंगाळ यांनी केले तर आभार जगन्नाथ सावळे यांनी मानले.