Breaking News

रस्त्यावर नमाज पठण केले, म्हणून तो मुस्लिमांचा होत नाहीः युक्तिवाद

नवीदिल्ली
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुस्लिमांनी नमाज पठण केले असेल; पण यामुळे त्या जागेवर दावा करण्याचा हक्क त्यांना मिळत नाही. खासकरून रचना, खांब, आकृतिबंध आणि शिलालेख या सर्व गोष्टी हिंदू असल्याचे सिद्ध करत असताना हा हक्क त्यांना मिळत नसल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. ‘राम लल्ला विराजमान’ची बाजू सर्वोच्च न्ययाालयात मांडणारे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी हा युक्तिवाद केला आहे.

मुस्लिम रस्त्यावर नमाज पठण करत असतील, म्हणून काही त्यांना त्या जागेवर मालकी हक्काचा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही, असा युक्तिवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केला. वैद्यनाथन यांनी खंडपीठाला अयोध्येतील वादग्रस्त जागेची रचना कोणत्याही अर्थाने मशिदीची नव्हती, असेही सांगितले. बाबरीमध्ये असणारे फोटो हे इस्लामिक विचारसणीला विरोधाभास करणारे आहेत. इस्लाममध्ये कधीही त्यांच्या प्रार्थनास्थळी कोणत्याही व्यक्ती किंवा प्राण्याचा फोटो नसतो, अशी माहिती वैद्यनाथन यांनी खंडपीठाला दिली. या वेळी त्यांनी 1990 मध्ये घेण्यात आलेले फोटो खंडपीठासमोर सादर केले.

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्याचे पाचही दिवस सुनावणी सुरू आहे. वैद्यनाथन यांनी गेल्या सुनावणीमध्ये बाबरी मधील मंदिराच्या अवशेषांवर उभी करण्यात आली होती, त्यामुळे ही जमीन कोणाच्या मालकीची आहे असा दावा करणे चूक ठरेल, असा युक्तिवाद केला होता. मंदिराच्या अवशेषांवर उभी राहिली असेल, तर ती मशीद असू शकत नाही. कारण हे शरियत कायद्याच्या विरोधात आहे, असेही वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.