Breaking News

‘भारिप बहुजन’चा आज सत्ता संपादन निर्धार मेळावा

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने नगर येथे युवकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास युवा नेते सुजात आंबेडकर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अमित भुईगळ प्रदेश महासचिव युवक प्रदेशाध्यक्ष, पक्ष प्रवक्त्या दिशा शेख व प्रदेश सचिव सचिन माळी, उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी डॉ. अशोक सोनवणे (जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ), डॉ. परवेज अशरफी (जिल्हाध्यक्ष एमआयएम) व डॉ. अरूण जाधव, सुनील शिंदे (शहर महासचिव), दिलीप साळवे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही स्थापित झाली. या देशातील जो समाज सत्ता, संपत्ती व सन्मानापासून वंचित राहिला आहे, या समाजाला एकत्रित करून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी मागील तीस वर्षापासून या महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग सुरू केली. कोणत्याही इतर पक्षाचा आधार न घेता आजपर्यंत भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आमदार, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका व पालिका यांच्यामध्ये सत्ता आणली आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रभावी कार्य केले आहे. आजपर्यंत देशात काँग्रेस व भाजपची सत्ता राहिलेली आहे. त्यांनी सामान्य वंचित बहुजन जनतेला सत्तेत स्थान दिलेले नाही. वंचित समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके, बौद्ध, ओबीसी, शीख, मुस्लिम व सामान्य मराठा, 169 प्रस्थापित घराणी वगळून तेही सत्तेपासून वंचित राहिला आहे.
स्वत:च्या ताकदीवर राजकीय फळी निर्माण करून या प्रस्थापित पक्षांना पर्याय निर्माण करून वंचित समाजातील घटकांना सत्तेत सहभाग मिळवून देण्याचे ध्येय वंचित बहुजन आघाडीने बांधले आहे. त्यांचा एक भाग म्हणून शहरात आज (दि.10) माउली सांस्कृतिक भवन येथे सकाळी 11.00 वाजता युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व युवकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा युवाध्यक्ष सागर भिंगारदिवे व जिल्हा युवा महासचिव विनोद गायकवाड यांनी केले आहे.