Breaking News

काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचे लचके तोडतील

राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

शिवसेनेने चार खासदारांना मुद्दाम पाडल्याचा आरोप

मुंबई
केंद्र सरकारने आज जम्मू काश्मीवर वरवंटा फिरवला, उद्या महाराष्ट्रावर फिरवतील. आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून इतर राज्यांसाठीही लागू असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात बोलतांना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 
371 मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. 370 कलमावर पेढे वाटले जात आहेत, पण 371 मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे असा संताप व्यक्त केला. कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
काही खासदार मंत्री नको म्हणून शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी चार खासदारांना मुद्दाम पाडले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असेही राज यांनी सांगितले. 23 मेला लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात 28 पैकी 25 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढच्या चारच दिवसात त्याच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली कशी? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसे शकते, बरं निवडणूक आयोगात जाऊन देखील न्याय मिळत नाही, ना न्यायालयांमध्ये असा आरोपही त्यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 350 खासदार निवडून येतील असा दावा भाजपचे नेते करत होते, आणि तसंच झालं. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 220,230 आमदार निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. आणि हा आकडा जनतेला खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचा आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या. एक दोन अपवादात्मक माध्यमं सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवर पण वरून दडपण आणलं जात आहे. आणि हे सगळं बहुमताच्या जोरावर केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.इतर राज्यात 370 नसतांना बेरोजगारी का ? 
पंतप्रधान मोदींनी 370 कलम रद्द करण्याबद्दल सांगताना काश्मीरात आम्ही रोजगार निर्माण करु असे आश्‍वासन दिले आहे. पण मग ज्या राज्यात तरुण बेरोजगार होतोय त्या राज्यांचे काय ? तिथे तर 370 कलम नाही आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात रोजगार नाही. महाराष्ट्रातही अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत. येथे तर 370 कलम नाही. जर तुम्ही रोजगार निर्माण करु शकत नसाल तर मग कोणते 370 कलम घेऊन बसला आहात?, असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी विचारला आहे.


ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या(ईडी) रडारवर असून लवकरच त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त काही दिवसांपुर्वी आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत विरोधात प्रचार करु नये यासाठी भाजपाने ईडीच्या मार्फत कारवाई करत रणनीती आखल्याची सुत्रांची माहिती होती. राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितलं की, वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.