Breaking News

महाराष्ट्रातील दोन युवकांचा युवा पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या दोन युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरचा ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकचा विनित मालपुरे अशी या युवकांची नावे आहेत. संस्था विभागातून चंद्रपूरच्या इको प्रो या बहुउद्देशीय संस्थेचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

देशभरातील 20 तरुण आणि तीन संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय युवा कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ओंकार हा कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थेसोबत काम करत त्याने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकारने महत्त्वाचे योगदान दिले आहे.

विनित याने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याने हे कार्य ग्रामीण भागापर्यत पोहचवले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून विनितने आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.