Breaking News

लोकांना बाहेर काढले अन् ‘महक’ कोसळली

कल्याण  / प्रतिनिधी
उल्हासनगरात पाच मजली ‘महक’ इमारत मंगळवारी सकाळी दहा वाजता कोसळली. सोमवारी इमारत रिकामी करून सीलबंद करण्यात आली होती. या इमारतीत 31 कुटुंबांत तब्बल 100 जण राहत होते. त्यांना बाहेर काढण्यात आले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेली माहिती अशी, की उल्हासनगर येथील लिंकरोड परिसरात असलेल्या महक या पाच मजली इमारतीला सोमवारी सकाळी तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक म्हणजे इमारत एका बाजूला झुकली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेच्या अधिकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेत या इमारतीतील 31 कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे आदेश देऊन इमारत सील केली होती. महक इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नसतानाही या इमारतीला तडे गेल्याने इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.