Breaking News

आत्मघाती निर्णय

संकटाच्या काळात शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. व्यक्तीच्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयाचे परिणाम त्या व्यक्तीपुरते किंवा फारतर त्याच्या संबंधात येणार्‍यांपुरते मर्यादित असतात. एखादा राष्ट्रपुरुष जेव्हा निर्णय घेत असतो, तेव्हा त्याने तर फार विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचे परिणाम संपूर्ण देशावर होणार असल्याने त्याची किमंत तर मोजावी लागणार नाही ना, याचा विचार करायला हवा. राष्ट्र कितीही मोठे किंवा लहान असले, तरी त्यात तज्ज्ञांची वानवा नसते. त्यांच्यातही देशप्रेम असते. उलट, संकटाच्या काळात अधिक विवेकबुद्धीने विचार करून ते निर्णय घेत असतात. युद्ध, संघर्षातून कुणाचीच प्रगती होत नसते. संपूर्ण देशाचे हीत पाहायचे, की कथित आक्रमणाची भीती दाखवून स्वतः ची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. सामान्य जनतेला राष्ट्रप्रेमाची अफूची गोळी देऊन गुंगीत ठेवले, की आपला कार्यभाग उरकतो, असे सर्वंच देशातील नेत्यांना वाटत असते. मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेत आल्यानंतर जेव्हा वस्तुस्थिती समजते, तेव्हा हाती काही राहिलेले नसते. पाकिस्तानात तर सामान्य जनतेच्या हितापेक्षा तेथील कारभार अल्ला, आर्मी आणि दहशतवादी यांच्या हितासाठीच केला जातो. आताही भारताने काश्मीरमधील 370 वे कलम रद्द केले, तेव्हा पाकिस्तानने त्यावर काहीच आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. पाकव्याप्त काश्मीरमधील दोन प्रांत मागच्याच वर्षी संघराज्यात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. त्यावर भारताने काहीही भाष्य केले नाही किंवा व्यापार थांबवायचा निर्णय घेतला नव्हता. पठाणकोटचा हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक संबंध तोडले, तर पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर व्यापारी संबंध तोडले. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने भारताच्या निर्णयावर टीका केली, तर समजण्यासारखे आहे, त्याचे कारण त्यांचे राजकारणच भारतद्वेषावर अवलंबून आहे; परंतु व्यापार बंद करण्याचे कारण नव्हते. जगातून कुठूनही साथ मिळत नाही, मदत मिळत नाही आणि भारत तर आक्रमक होत चालला आहे, त्यामुळे तीळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताबरोबर व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारचा हा निर्णय आता त्यांना स्वत:च्याच पायावर धोंडा मारुन घेतल्यासारखा वाटू लागला आहे. या निर्णयानंतर भारतामधील आयातीवर आधारित उद्योगांमधील कामगारांचा रोजगार बंद झाला आहे. तसेच भारतातून पाकिस्तानात आयात होणार्‍या कांदा, टोमॅटोसारख्या गोष्टी बंद झाल्याने गरजेच्या वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. एका वृत्तानुसार नेहमी ईदच्या आधी बाजारांमध्ये असणारा उत्साह यंदा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. ईदसाठी खरेदी करायलाही लोकांकडे पैसे नाहीत, अशी स्थिती होती. अनेकांकडे खर्च करण्यासाठी पैसेच उपलब्ध नसल्याने बाजारपेठांमधील गर्दी आटली.

व्यापार्‍यांबरोबरच सामान्य जनतेलाही यंदाची ईद उत्साहात साजरी करणे कठीण झाले होते. भारतातून येणार्‍या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागल्याने महागाई भरमसाठ वाढली आहे. अनेकांच्या घरचे मासिक बजेट या अचानक वाढलेल्या महागाईमुळे सणासुदीच्या तोंडावर कोलमडले. आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीमधून जात असताना सरकारने भारताबरोबर व्यापारबंदीचा आत्मघाती निर्णय घेतल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आधीच अर्थव्यस्थेचे कंबरडे मोडले असताना भारतातील वस्तूच्या आयातीवर बंदी घालून पाकिस्तानी सरकारने देशातील सामान्यांच्या खिशाला कात्रीच लावली आहे. अनेक मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असणार्‍यांची कमाई वाढत नसली तरी दुसरीकडे दूध, भाज्या, मांस यांच्या किंमती वेगाने वाढत असल्याने घरातील खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार दोन्ही देशांमध्ये आठवड्यातील चार दिवस केवळ 30 ते 35 ट्रक येण्याजाण्यास परवानगी असतानाही भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्षाला तीन अब्ज रुपयांचा व्यापार होतो. आठवड्यातले चार दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी चारच्या दरम्यान भारत पाकिस्तानदरम्यान व्यापारी ट्रकची वाहतूक व्हायची. भारत पाकिस्तानमध्ये व्यापार करणारे 300 नोंदणीकृत व्यापारी आहेत. या व्यापाराचे नियम कठोर आहेत. हा संपूर्ण व्यापार देवाण-घेवाण पद्धतीने होतो. म्हणजे इकडच्या वस्तूंच्या बदल्यात तिकडे उत्पादित होणार्‍या तेवढ्याच किंमतीच्या वस्तूंचे आदान प्रदान करणे. सोप्या शब्दात सांगायचे तर मालाच्या मोबदल्यात माल असा हा व्यापार होतो.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारताबरोबरचा व्यापार बंद झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींसाठी आम्ही भारतावर अवलंबून आहोत. खास करून कांदा, टोमॅटो आणि रसायने भारताकडून येतात. यासाठी पाकिस्तान पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. त्यामुळेच आता ईदच्या तोंडावर सामान्यांच्या खिशावर ताण पडला असून ईदचा उत्साह कमी होता. ईदच्या नंतर पाकिस्तानमध्ये लग्नांचा काळ सुरू होणार असून त्यावरही आर्थिक मंदीचा परिणाम जाणवणार आहे. लग्नकाळ संपल्यानंतर लगेचच मोहरमची सुरुवात होणार आहे. त्यामुळेच भारताबरोबर व्यापार बंदी हा पाकिस्तानचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताबरोबर व्यापारबंदीची घोषणा केल्यानंतर भारतावर काही विशेष परिणाम झालेला नाही.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून येणार्‍या गोष्टींवर दोनशे टक्के आयात कर लावल्याने पाकिस्तानमधील वस्तूंची होणारी आयात 92 टक्क्यांनी कमी झाली आहे. याच हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा भारताने काढून घेतला आहे. या सर्वाचा पाकिस्तानच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. कोणताही निर्णय परिणामांची पर्वा न करता घेतला, तर त्याची किमंत मोजावीच लागते. पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी व्यापारबंदीमुळे आणखी वाढली आहे. भारतातून येणारा माल चीन आणि कोरियन मालाच्या तुलनेत 30 ते 35 टक्के स्वस्तात मिळतो. शिवाय इतर देशांच्या तुलनेत आयातीसाठी वेळही खूप कमी लागतो. एवढेच नाहीतर वाहतूक खर्चही कमी येतो. पकिस्तानमध्ये महागाई शिखरावर असताना भारतीय मालावर बंदीचा निर्णय घेऊन पाकिस्तानने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला; मात्र पाकिस्तानातील उद्योजकांनी नुकसान झाले तरी चालेल; परंतु देशाच्या निर्णयाबरोबर असल्याचे म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात टोमॅटो दोनशे रुपये किलो, दूध दोनशे रुपये लिटर झाले होते. आता पाकिस्तानमध्ये टोमॅटो तीनशे रुपये किलो झाला आहे. पाकिस्तानला सर्वाधिक फळे आणि भाजीपाला पुरवणार्‍या आझादपूर बाजारपेठेत भारतीय व्यापार्‍यांनी माल न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अटारी-वाघा मार्गावरून पाकिस्तानात दररोज 75 ते 100 ट्रक टॉमेटो जात होते; मात्र व्यापार्‍यांनी टॉमेटोची निर्यात थांबवली आहे. अन्य भाजीपाला, फळे, सुती धागे यांचे व्यापारीही या मार्गावरून व्यापार थांबवत आहेत. व्यापारी संबंध संपवल्याचा परिणाम केवळ टॉमेटोवरच नाही, तर बटाटे, कांदे आणि हिरव्या भाज्यांवरही होऊन त्याही महागल्या आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय तेथील जनतेच्या चांगलाच अंगलट आला आहे. व्यापारी, उद्योजकांची भूमिका देशाच्या निर्णयाबरोबर असल्याची आहे; परंतु देशप्रेमाची किमंत सामान्यांना मोजावी लागते आहे. दहा टक्क्यांहून अधिक वाढलेली महागाई सामान्यांचे जिणे हराम करणारी आहे. सामान्यांच्या मनात सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्याचा उद्रेक होण्याअगोदर सरकारला जाग आली, तरच तिथे शांतता राहील.