Breaking News

पूरग्रस्तांसाठी नाना पाटेकर बांधणार पाचशे घरे

कोल्हापूर/ प्रतिनिधी
नाम फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता.14) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. शिरोळमध्ये शंभर टक्के जमीनदोस्त झालेली घरे आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. नाम फौंडेशनकडून शिरोळ तालुक्यात पाचशे घरे बांधून दिली जाणार आहेत, असे पाटेकर यांनी सांगितले.
नाना म्हणाले, की सरकारने रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजनेच्या अटी शिथील करून द्याव्यात. तसेच या योजनेद्वारे घरकुलसाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावा. उरलेले पैसे नाम घालेल आणि त्या कुटुंबाला पक्के घर उभे करून देईल. यासंदर्भात, नाम फौंडेशनच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सर्व विषय मार्गी लावणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायचा आहे. हेच माझे पुण्य आहे, असेही नाना पाटेकर म्हणाले.

या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, जिल्हा परिषदेचे माजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलिस उपअधीक्षक किशोर काळे उपस्थित होते.