Breaking News

डी. राजा आणि येचुरींना विमानतळावर रोखले

श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या भेटीवर गेलेले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) चे महासचिव सीताराम येचुरी आणि डी. राजा यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले. येचुरी यांनी स्वतः ट्वीट करून पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतल्याची माहिती दिली. सीपीआयएमचे महासचिव सीताराम येचुरी आणि डी. राजा हे कॉम्रेड युसूफ तरिगामी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी श्रीनगरमध्ये गेले होते. मात्र, श्रीनगर पोलिसांनी दोघांनाही विमानतळावरच रोखले.
येचुरी यांनी पोलिसांना दौर्‍याचे कारणही सांगितले पण पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत दोघांना ताब्यात घेतले आहे. येचुरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. सोबत राज्यपालांना लिहिलेले पत्रही ट्विटवर टाकले आहे. आम्ही पोलिसांशी चर्चा करीत आहोत. पण श्रीनगरमध्ये प्रवेश बंदीचे आदेशच त्यांनी आम्हाला दाखवले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे सुरक्षा जवानांनाही प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे  असेही पोलिसांनी सांगितल्याचे येचुरी यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मिरातून कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना विमानतळावरूनच दिल्लीला परत पाठवले होते. काश्मीरात सुरक्षेच्या कारणामुळे संचारबंदी लावण्यात आली असली तरी आज, शुक्रवारी नमाज करण्यासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही काश्मीरात तळ ठोकून आहेत.