Breaking News

पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी : अण्णा हजारे

अहमदनगर/प्रतिनिधी
“सांगली, कोल्हापूर आणि इतरत्र अति पर्जन्य होऊन नद्यांना महापूर येऊन अनेक गावे, घरे पाण्याखाली गेली. यामुळे हजारो कुटूंब बेघर झाली. जनावरांचीही फार मोठी हानी झाली. प्रसार माध्यमे, दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील जनतेने तातडीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी, बिस्कीटे, इतर खाद्य पदार्थांचे आणि कपड्यांचे मदतीचे ट्रक, टेम्पो कोल्हापूर व सांगलीकडे जाऊ लागले. राळेगण सिद्धी परिवाराने एक ट्रक साहित्य पाठविले होते. पारनेर येथील नागेश्‍वर मित्र मंडळानेही एक ट्रक साहित्य पाठविले’’, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी दिली.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे.   पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सैनिकांनी जे काम केले त्याला तोड नाही. ग्रामस्थांना मदत करून काही गावातील सैनिक गावाचा निरोप घेऊन गाव सोडून जाताना त्या गावातील महिला सैनिकांना राखी बांधून निरोप देत होत्या आणि दोन्ही बाजूंनी अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या परिस्थितीला कोण दोषी आहे? वगैरे गोष्टींचा उहापोह करण्याची आजची वेळ नाही. पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळणे महत्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले की, पूर ओसरल्यानंतर, जी घरे पाण्याखाली गेल्यामुळे त्या कुटूंबातील माणसे फक्त अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडली आहेत त्यांना दैनंदिन वापरात येणार्‍या कपड्यांची गरज आहे. तसेच अंथरूण-पांघरूणासाठी वापरणारे कपडे, मुलांना वह्या पुस्तके, दररोज वापरात येणारी स्वयंपाक, जेवणाची आणि इतर भांडी, पूर ओसरल्यानंतर गावात रोगराई पसरू नये म्हणून त्यांना जंतूनाशक औषधे, जनावरांसाठी पशूखाद्य, कच्च्या घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना तातडीचा निवारा आदी गोष्टींची गरज आहे.
शासन आपल्या परीने प्रयत्न करत असले तरी प्रत्येक कुटुंब किंवा माणसापर्यंत पोहचेल की नाही हा प्रश्‍न आहे? कारण काम मोठे आहे. त्यासाठी मानवतेच्या दृष्टीने सर्व जनतेने कर्तव्यभावनेने काम वाटून घेणे आवश्यक आहे. विशेषत: धन दौलतीने परिपूर्ण असलेल्या व्यक्तींनी या आपत्तीमध्ये त्यांचे दुःख वाटून घेणे आवश्यक आहे. दुःखी, पीडीत, रंजले- गांजलेल्या माणसांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी ईश्‍वर सेवा आहे.
आपण जनतेची सेवा घडावी म्हणून आयुष्यात जनसेवेचे व्रत घेतले, बँक अकाउंट कुठे असतो हे माहीत नाही. फक्त जनतेची सेवा घडावी हेच व्रत घेऊन काम करत आलो. जी माणसे महापुरासारख्या आपत्तीमध्ये सापडली आहेत अशा माणसांना आज आपत्तीमध्ये सापडलेल्या माणसांना शक्य होईल ती मदत करणे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे.
गुजरातमधील भूकंपामध्ये कच्छ परिसरात सहा महिने राहून त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अण्णा हजारे यांनी शेवटी सांगितले.