Breaking News

देखावे न करता पूरग्रस्तांना गणेश मंडळाची मदत

अहमदनगर/प्रतिनिधी
कोल्हापूर-सांगली यासारख्या भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. या सर्व पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचा हात म्हणून शहरातील गणेश मंडळे पुढे आले असून, यंदाच्या वर्षी गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे  शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले. शहरातील मानाच्या गणपती मंडळासह विविध पदाधिकार्‍यांनी आपले मत व्यक्त करताना चौकातील भंडारा व आरस यासारख्या गोष्टी न करता आम्ही पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या बैठकीस विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, “गेल्या 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने तेथील नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तेथे झालेली हानी पुढील अनेक दिवस भरुन निघणार नाही. वास्तविक पाहता या ठिकाणच्या नागरिकांचे संसार उभे राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच, संसारोपयोगी वस्तूंचीही मदत करण्याचा मानस आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने भंडारा व आरस व त्याचबरोबर डीजे हेही लावणार नसल्याचे सांगून,मंडळ यावेळेस साध्या पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना करणार असल्याचे सांगून या सामाजिक कार्यात शहरातील सर्व मंडळानी सहभागी व्हावे व पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी मदत करावी’’, असे आवाहन कदम यांनी केले.
बाळासाहेब बोराटे म्हणाले, “कोल्हापूर व सांगली येथे झालेली वित्तहानी ही मोठी असून तेथील नागरिकांना उभे राहण्यासाठी जिल्ह्यातून मदतीचा ओघ पाठविण्याचा मानस आहे. तसेच मनपाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. जर मंडळेच देखावे व कार्यक्रम सादर करणार नसतील तर ही स्पर्धा या वर्षीसाठी रद्द करुन तो निधी पूरग्रस्तांना देण्यात यावा’’, अशी मागणी केली.
नगरसेवक अविनाश तात्या घुले, दत्ता कावरे व माजी नगरसेवक विपुल शेटीया यांनीही आपल्या मंडळाच्या वतीने अनावश्यक खर्च टाळून ती सर्व रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अनेक मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही या उपक्रमात आपण सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच एखादी गाव दत्तक घेऊन त्या गावाचे पुनर्वसन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगर शहरातील छोटे-मोठे सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. तसेच 15 ऑगस्टला सायं. 7 वा. बुवाजी बुवा मंदिर, कौठीची तालीम, माळीवाडा येथे होणार्‍या बैठकीसाठी शहरातील मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
यावेळी परेश लोखंडे, शिवाजी कदम, दिलदारसिंग बीर, अभिमन्यू जाधव, दत्ता गाडळकर, शंभू गिरवले, त्रिशूल उर्णे, सचिन गाडेकर, उमेश भागानगरे, ऋषीकेश चक्के, किरण शिंगी, ओंकार फुलसौंदर, सनी बहिरवाडे, गौरव बुगे, विनायक ताठे, बाबू कावरे, शुभम भापकर, दीपक थोरात, अनिकेत लोंढे, चेतन गाडळकर, अभिषेक खंदारे, श्रीकांत लगड, लंकेश हरबा आदी उपस्थित होते.