Breaking News

कसाबला जिवंत पकडणारा पोलिस निरीक्षक निलंबित

मुंबई / प्रतिनिधी
26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणार्‍या पोलिस अधिकार्‍यांपैकी एक पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांना निलंबित करण्यात आले आहे. गोविलकर आणि आणखी एक सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सिंगोट अशा दोघांवर मुंबई पोलिस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या सोहेल भामला याला सोडल्याच्या आरोपावरून या दोघा पोलिस अधिकार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सोहेलच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तो दुबईवरून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती; मात्र आर्थिक गुन्हा शाखेत कामाला असलेल्या या दोघा अधिकार्‍यांनी चौकशीनंतर सोहेलला सोडून दिले होते. कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याच्या आरोपावरून पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी त्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.