Breaking News

पुरग्रस्त शेतकर्‍यांचा तहसीलवर मोर्चा

पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी

नेवासे/प्रतिनिधी
 पूरग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी, यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्ष व पुरग्रस्त शेतकर्‍यांचा नेवासे तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यात लोकप्रतिनिधीच्या फसव्या आश्‍वासनाविरोधात विरोधात संताप व्यक्त करून निवेदन देण्यात आले.
  नेवासे तालुक्यातील घोगरगाव, जैनपूर, सुरेगाव गंगा, भालगाव, उस्थळखालसा, बोरगाव, टोका, वाशीम, गोधेगाव, बकुपिंपळगाव, मुरमे या गावातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. यात ऊस, मका, कडवळ, कपाशी, घास या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेकडो कुटुंब स्थलांतरित झाले. अनेकांचे प्रपंच व घर पाण्यात बुडाले. गेल्या चार दिवसापासून पाण्याचा प्रकोप झाला तरी ढिम्म प्रशासनाने आजूनही पंचनामे केले नाहीत. लोकप्रतिनिधीने केवळ फोटोसेशन पुरत्या भेटी दिल्या. ताडपत्री व रोख मदत देण्याचे आश्‍वासन दिले. परंतु आज चार दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने अजून पंचनामे केले नाहीत. लोकप्रतिनिधीनेही अजून कुठलीच भुमीका घेतली नाही. म्हणून संतापलेल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्वरित पूरग्रस्त भागातील पंचनामे व्हावेत व तातडीची आर्थिक मदत मिळावी. यासाठी सहकुटुंब नेवासे तहसील येथे मोर्चा काढला. यात 500 ते 550 नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार रुपेश सुराणा यांना या मोर्चेकर्‍यांनी आपले न्याय मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. जि.प. सदस्य दादासाहेब शेळके, पं.स.सदस्य रविंद्र शेरकर, कैलास झगरे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, वसंत शेरकर, राजेंद्र साठे, अशोक शिंदे, प्रभाकर पटारे, बंडूपंत चौगुले, संदीप सुडके, सीताराम जाधव, बाळकृष्ण भागवत, प्रशांत तनपुरे उपस्थित होते.