Breaking News

कोपरगावमध्ये मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांना मदत

कोपरगाव ता/प्रतिनिधी
 अल्लाच्या प्रती केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून बकरी ईद सण साजरा केला जातो. पण यंदा राज्यात महापूर, आपत्ती, दुष्काळाचे संकट ओढवल्याने कोपरगावच्या मुस्लिम बांधवांनी साधेपणाने ईद साजरी करून सामाजिक भावनेतून हाजी सद्दाम भाई सय्यद यांनी 21 हजार रुपये तर मेहमूद सय्यद यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना केली आहे.
 कोपरगाव भारतीय जनता पक्ष, संजीवनी उद्योग समूह व महिला आघाडीच्यावतीने बकरी ईद कार्यक्रम सोमवारी शहरात साधेपणाने साजरा करण्यात आला.
  याप्रसंगी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी महापुराचे संकट मोठे असल्याने सर्वांनी आपापले सण साधेपणाने साजरे करून पूरग्रस्तांना सर्वाधिक आर्थिक मदतीचे आवाहन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, गटनेते रवींद्र पाठक, सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, पराग संधान, शिवसेनेचे कैलास जाधव, पतसंस्था फेडरेशनचे हाशम भाई पटेल, हाजी मोहम्मद खान, मौलाना पिरखान, रियाज शेख, युसूफ भाई शेख, इलियास खाटीक, फकीर महंमद पहिलवान, सेनेचे शहराध्यक्ष असलम शेख, अकबर लाला, करीमलाला, फिरोज पठाण, शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे आदी उपस्थित होते.
 यावेळी आ.कोल्हे म्हणाल्या की, संकट आपल्याला नवीन नाही, बिपिन कोल्हे यांनी दुष्काळ, गारपीट, महापूर नैसर्गिक आपत्ती, भूकंप, यात सर्वप्रथम कोपरगावातून सर्वाधिक मदत केलेली आहे.   संजीवनी युवा फाउंडेशन व सर्व सामाजिक संघटना कार्यकर्ते राजकारणविरहित या संकटात धीर देण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. बकरी ईद मुस्लिम बांधवांनी साधेपणाने साजरी करून कोपरगाव महापूर ग्रस्था बरोबरच, कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला ही बाब सर्वांना प्रेरणा देणारी आहे.