Breaking News

पुराला अत्यंत गंभीर दर्जाची आपत्ती घोषित करा : सचिन सावंत

मुंबई
सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ‘या पुरला अत्यंत गंभीर दर्जाची आपत्ती घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
सचिन सावंत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ‘महापुराने जनेतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार पुराला अत्यंत गंभीर स्वरुपाचा ‘एल 3’ हा दर्जा द्यावा’, अशी मागणी केली आहे. या पुराला ‘एल 3’ हा दर्जा दिल्यास राज्य आणि केंद्र सरकार या दोघांचीही आपत्ती निवारणाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल अस सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान पूरपरिस्थितीशी नागरिकांचे संघर्ष सामना असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध यंत्रणांनी या दोन्ही जिल्ह्यातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि 22 हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.