Breaking News

भारतावर हल्ल्याचा विचारही न करण्याची अमेरिकेची पाकिस्तानला तंबी

वॉशिंग्टनः
भारताने जम्मू-काश्मीरला स्वायत्ततेचा दर्जा देणारे कलम 370चा प्रभाव संपवल्याने आणि राज्याला केंद्राच्या अखत्यारित आणल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. हा आमचा अंतर्गत प्रश्‍न असल्याने यावर निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार असल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. त्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याची धमकी भारताला दिली आहे. त्यावर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा विचारही करू नये; उलट आधी आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तानला झापले आहे.

अमेरिकेने म्हटले आहे, की पाकिस्तानने भारताविरोधात कोणतीही आक्रमक कारवाई करू नये तसेच नियंत्रण रेषेनजीकच्या भारतीय भूभागात होणारी घुसखोरी रोखावी. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतासोबतचा व्यापार आणि बससेवा बंद करण्याचा तसेच भारतातील आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच कलम 370चा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडण्याचाही निर्णय घेतला आहे.
काश्मीरबाबत भारताने उचललेल्या पावलांमुळे भांबावलेल्या पाकिस्तानने बुधवारी अनेक देशांच्या नेत्यांशी संवाद साधला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्यावरून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी संवाद साधला तसेच सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबतही चर्चा केली. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.
अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधी सभेच्या विदेश प्रकरणांच्या समितीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेज यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी आणि आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारावायांसाठी होऊ देऊ नये. त्याचबरोबर नियंत्रण रेषेजवळील भारतीय भागांमध्ये घुसखोरी होऊ देता कामा नये. दहशतवादाविरोधात ठोस आणि कडक पावले उचलण्यात यावीत. यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, की अमेरिकेची भारताच्या हालचालींवर बारीक नजर आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी संयम बाळगावा तसेच काश्मीरमधील तणाव दूर करण्यासाठी पावले उचलण्यावर भर द्यावा.