Breaking News

भारताला बनविणार उद्योगस्नेही राष्ट्र

मोदी यांची ग्वाही; गुंतवणुकीसाठी जगातील सर्वोत्तम केंद्र करणार

नवी दिल्ली
भारतावर असलेला विश्‍वास खासगी कंपन्यांनी कायम ठेवायला हवा, असे आवाहन करतानाच आम्ही गुंतवणुकीसाठी भारताला जगातील सर्वोत्तम केंद्र बनवू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी 2008 ते 2014 या काळात काय झाले, याचा आम्ही विचार करत नाही, तर दीर्घकालीन विकासावर आमचा भर आहे, असे सांगितले. गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासह खासगी क्षेत्रात तेजी आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी त्यांनी विदेशी गुंतवणूक, निर्यात, ऑटोमोबाइल क्षेत्र आणि कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या संधीबाबत सविस्तर माहिती दिली.

केवळ देशातील लोकांना भारताकडून अपेक्षा नाहीत, तर वैश्‍विक विकासाच्या बाबतीतही आपल्याकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यात येतील. भारतामध्ये जी विकासाची क्षमता आहे, ती प्राप्त करण्याचे ध्येय आहे. अलीकडेच कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक प्रसिद्ध उद्योगपतींनी जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही बंधने असली, तर आर्थिक विकास होऊ शकत नाही आणि एकत्रिकरणाने गुंतवणूक, नावीन्यता आणि उत्पन्नही वाढेल, असे मोदी यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने सांगितले. काश्मीरमध्ये पर्यटन, कृषी, आयटी, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांत गुंतवणूकीच्या अपार संधी आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना कौशल्य, कठोर मेहनतीचे योग्य फळ आणि त्यांच्या वस्तूंना योग्य किंमतही मिळेल, असे वातावरण निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला.

मोदी म्हणाले, की उद्योगांचे उत्पादन आणि त्यांचा नफा वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. उद्योग झपाट्याने वाढून त्याचा विस्तारही व्हायला हवा. भारतात आणि जागतिक बाजारपेठांपर्यंत कंपन्या पोहोचल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळाला पाहिजे. अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. सध्याची मंदी अस्थायी स्वरुपाची आहे. काही काळानंतर ती दूर होईल आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी ही चिंतेची बाब नाहीच, असा विश्‍वास व्यक्त करतानाच लवकरच हे क्षेत्र उभारी घेईल, असे ते म्हणाले. इलेक्ट्रीक वाहने आणि एकूणच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी आमच्याकडे चांगली बाजारपेठ आणि उत्तम धोरणे आहेत. पुढील पाच वर्षांसाठी 100 लाख कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
जीएसटीच्या फायद्यासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे सरकारचे पुढचे पाऊल असेल. एका सर्वेक्षणानुसार, जीएसटी दर कपातीतून एका मध्यमवर्गीय कुटुंबाची वर्षाला दीड हजार रुपये बचत होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

काश्मीरच्या समृद्धीची उघडतील दारे
एका क्षेत्राला दुसर्‍या क्षेत्राशी जोडण्यासाठी रस्ते, नवीन रेल्वे मार्ग आणि विमानतळाच्या आधुनिकरणाची कामे प्रस्तावित आहेत. उत्तम दळणवळण सुविधा आणि गुंतवणूकीसाठी योग्य वातावरण यामुळे राज्याचा विकास आणि सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढेल. राज्यातील उत्पादित वस्तू संपूर्ण देशभर आणि विदेशात पोहोचू शकतील, असा विश्‍वास व्यक्त करताना 370 कलम रद्द केल्यामुळे काश्मीरच्या समृद्धीची दारे उघडतील, असा दावा मोदी यांनी केला.


रिलायन्स करणार काश्मीरमध्ये गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दलचा दृष्टिकोन पाहता आमच्या कंपनीने त्या भागात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. त्यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली असून याबद्दलची योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, असे अंबानी यांनी सांगितले. पुलवामातील हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रिलायन्स करेल,’ अशी घोषणा अंबानी यांनी केली.