Breaking News

पुरामुळे होणाऱ्या संभाव्य आजारांबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
तालुक्यात आलेल्या महापुरामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आजाराबाबत योग्य त्या उपाययोजना करून खबरदारी घ्यावी अशा सूचना पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी कोपरगाव तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

  मागील आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे कोपरगाव तालुक्याच्या गोदावरी नदीकाठच्या गावातील महापुराच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. महापुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा व साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांचे वाढलेले प्रमाण त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या गोष्टीची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी गंभीरपणे दखल घेत सभापती अनुसया  होन यांना तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याच्या सुचना केल्या होत्या.

      त्यानुसार सभापती होन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच त्यांच्या दालनात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपसभापती अनिल कदम, कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. विकास घोलप, डॉ. अनिकेत खोत (संवत्सर), डॉ. अजिंक्य आढाव (चासनळी), गटविकास अधिकारी पंडीत वाघिरे, आरोग्य पर्यवेक्षक आर. एम. भांगे, आरोग्य सहाय्यक आर. जे. दिवाने, रविंद्र शिनगारे, अनिल सोमवंशी, रोहिदास होन आदी उपस्थित होते. यावेळी सभापती सौ. अनुसयाताई होन यांनी कोपरगाव तालुक्याच्या पूरग्रस्त भागातील प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात शिल्लक असलेल्या औषधसाठा किती आहे तसेच पूरपरिस्थितीमुळे कोणते आजार उदभवू शकतात याचा आढावा घेतला. आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्ण वेळ आरोग्य केंद्रात थांबावे तसेच मलेरिया, टायफाईड, डेंग्यू आदी आजारांबाबत जनजागृती करावी अशा सुचना केल्या. तसेच ग्रामपंचायती मार्फत किमान पाच धूर फबारणी मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे सभापती  अनुसयाताई होन व विस्तार अधिकारी पंडीत वाघिरे यांनी या बैठकीत सांगितले.