Breaking News

काश्मीरला येतो; पण मुक्त संचार करता येईल?

राहुल गांधी यांचा राज्यपाल मलिक यांना सवाल

नवीदिल्ली, श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जम्मू-काश्मीरची वास्तव परिस्थिती पाहा आणि मगच टीका करा, असे सांगणार्‍या मलिक यांचे जम्मू-काश्मीर भेटीचं निमंत्रण राहुल यांनी स्वीकारले आहे. ‘मी येतो; पण तिकडे मुक्तपणे फिरता येईल काय,’ असा सवाल राहुल यांनी मलिक यांना केला आहे.

370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर राहुल यांनी वक्तव्य केले होते. त्याला राज्यपाल मलिक यांनी आक्षेप घेतला होता. मलिक यांनी राहुल यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्लाही दिला होता. ‘मी राहुल यांना जम्मू-काश्मीरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. तुमच्यासाठी विमान पाठवतो. परिस्थितीची पाहणी करा आणि मगच बोला, असे त्यांना सांगितले आहे. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती असल्याने जबाबदारपूर्वकच वक्तव्य करावे, असा सल्लाही त्यांना दिला,’ असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी ट्विट करून मलिक यांना उत्तर दिले आहे.

विरोधी पक्षनेत्यांसोबत मी जम्मू-काश्मीर आणि लडाखला येणार आहे. मला विशेष विमान पाठवण्याची गरज नाही. फक्त जम्मू-काश्मीरमध्ये मुक्तपणे फिरण्याची परवानगी द्या. तेथील नागरिक, प्रमुख पक्षांचे नेते आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांनाही भेटण्याची परवानगी द्या,’ असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर राहुल यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले होते, की जम्मू-काश्मीर अशांत असल्याची वृत्ते येत आहेत. सरकारने तेथे माध्यम आणि एकूणच संवादावर बंदी आणली आहे. मी सरकारला विनंती करतो, की त्यांनी जम्मू-काश्मीरच्या लोकांना सुरक्षेची हमी द्यावी आणि जी गुप्तता पाळली जात आहे, त्यावरील पडदा हटवावा. सत्यपाल मलिक म्हणाले होते, कलम 370 आणि कलम 35ए हटवण्यात आले आहे. याला धार्मिक रंग नाही. लेह, कारगिल, राजौरी, जम्मू, पूंछ कोठेही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत.

370 हटविण्याची पद्धत असंविधानिक
जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 370 कलम लोकशाही मार्गाने हटविण्यात आले नाही. हे कलम हटविण्याची सरकारची पद्धत असंवैधानिक आहे,’ अशी टीका प्रियंका यांनी केली आहे.