Breaking News

चांगले वक्तृत्व माणसाचे आयुष्य बदलू शकते : वरखडे

अहमदनगर/प्रतिनिधी
“माणसाचे आचार विचार कसे आहेत, त्यावर तुमचे वक्तृत्व अवलंबून आहे. ज्यांचे वक्तृत्व चांगले होते, त्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच बंधू-भगिनींच्या शब्दांनी अख्या जगाचे मन जिंकले. बोलायचे कसे, थांबायचे कुठे हे ज्याला कळलं तोच खरा वक्ता. नोकरी न करता व्याख्यानाच्या माध्यमातून महिन्याला लाख रुपये कमवणारे व्याख्याते आपण पाहिले आहेत. चांगले वक्तृत्व माणसाचे आयुष्य बदलू शकते’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांनी केले.
नगर येथील जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजच्या वतीने जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माधवराव मुळे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव नंदकुमार गोरे, प्राचार्या मृणालिनी गोरे, रजिया इनामदार, डॉ. संतोष गिते, डॉ. मनोहर कराळे, भागाजी नारळे, संजय कोतकर, विठ्ठल दुसुंगे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
वरखडे पुढे म्हणाले, “शालेय जीवनापासूनच वक्तृत्वाची आवड असायला हवी. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला तर चांगले ऐकायला मिळते. बक्षीस मिळो अथवा ना मिळो निराश न होता ज्ञानार्जन वाढीसाठी खूप मोठा फायदा आहे हे मुलांनी लक्षात घ्यायला हवे. आचार्य अत्रे यांच्यासारखे वक्ते एका एका शब्दाचा अर्थ सांगत होते. ‘मी वक्ता कसा झालो’ हे त्यांचे अजरामर झालेले पुस्तक आहे. त्याचे अवलोकन करावे. प्रसंगावधान चातुर्य हे वक्तृत्वातून मिळते, असे ते म्हणाले.
यावेळी विद्यालयाचे सचिव नंदकुमार गोरे म्हणाले, “या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना समाजाचे असलेले प्रश्‍न समजावेत, हा मूळ उद्देश आहे. नाती जपा, छत्रपती शिवरायांचे विचार आजही उपयुक्त, आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत का? स्वच्छ भारत अभियान, मी नकोशी का झाले? हे समाजाशी संलग्न असलेले विषय देण्यात आले. यासाठी 7 मिनिटांचा वेळ होता. नगर शहर व तालुक्यातील 50 शाळांतील 8 ते 10 वी तील सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला, असे ते म्हणाले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मृणालिनी गोरे म्हणाल्या, जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माधवराव मुळे यांच्या जयंतीनिमित्त जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील विजेत्यास 5 हजार 1, द्वितीय विजेत्यास 2 हजार 501 व तृतीय 1 हजार 501 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल.
14 ऑगस्टला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल, असे त्यांनी सांगितले. परीक्षक म्हणून प्रा. रभाजी औटी, रूपा राव, प्रणिला फंड यांनी काम पाहिले.