Breaking News

कोरठण येथे उद्या श्रावणी पौर्णिमा उत्सव

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वतीने 15 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा उत्सव व 18 ऑगस्टला कुस्त्यांचा आखाडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पौर्णिमेला 15 ऑगस्टला सकाळी 6 वा. खंडोबा मंगलस्नान, साजश्रृंगार नंतर अभिषेक पूजा, महाआरती, सकाळी 9 वा. खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून कोरठण गडाला प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. ढोल ताशांच्या गजरात लेझीम खेळत सदा आनंदाचा येळकोटचा जयघोष करत भंडारा-खोबरे उधळत प्रदक्षिणा करतील. यावेळी हजारो भाविकांचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन होईल, लंगर तोडल्यावर पालखीला नैवैद्य आदी धार्मिक विधी होऊन पालखी मंदिरात आगमन होईल.
सकाळी 11 वा. पासून जुन्नर तालुक्यातील औरंगपूर ग्रामस्थ तसेच सुरेश कोते, पुणे, वैभव मुळे, मांजरवाडी व गायकवाड परिवा, पिंपळगाव रोठा यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप होईल. देवस्थानतर्फे दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंग, पिण्याचे पाणी नियोजन आहे.
18 ऑगस्टला श्रावणातील तिसर्‍या रविवारी कुस्त्यांचा आखाडा कोरठण गडावर भरणार आहे. या आखाड्यात 30 वर्षाखालील कुस्त्या लावल्या जाणार आहेत. या उत्सवात पहिलवान, प्रेक्षक, भाविक यांना देवस्थानतर्फे महाप्रसाद देण्यात येणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस  मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्‍वस्त अश्‍विनी थोरात, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ, किसन धुमाळ, दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ आदींनी केले आहे.