Breaking News

रात्रशाळा कर्मचार्‍यांना मिळणार पेन्शन योजना : आशिष शेलार

अहमदनगर/प्रतिनिधी
“रात्रशाळा कर्मचार्‍यांना पूर्णवेळ वेतनश्रेणी मिळण्यासाठी व त्यांना सेवा सातत्य देण्यासाठी शासनाच्या वतीने अभ्यास गट तयार करण्यात आलेला आहे. त्या अभ्यास गटातील अध्यक्ष, सचिव यांना रात्रशाळा कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना समक्ष भेटून देण्यात आले. रात्रशाळा व अर्धवेळ ग्रंथपाल यांना 17 मे 2017 नुसार वेतनलाभ, पेन्शन योजना लाभ देण्याबाबत पुढील आठवड्यात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे’’ असे प्रतिपादन शिक्षणमंत्री शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
या बैठकीसाठी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, संघटनमंत्री सुनील पंडित, राज्य संयोजक निरंजन गिरी, शिवनाथ दराडे, संतोष धावडे आदींसह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 घोषित-अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांना पात्र घोषित करुन वाढीव टप्प्याचे अनुदान प्रत्यक्ष लागू करावे, 2016, 2019 मध्ये 20 टक्के अनुदान दिलेल्या शाळांना 100 टक्के अनुदान लागू करण्याबाबत, अंशत: अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करून सेवा सरंक्षण देण्याबाबत, अपंग समावेशीत शिक्षण योजना माध्यमिक स्तर 2009 या योजनेत नियुक्त केलेल्या विशेष शिक्षकांना व कर्मचार्‍यांना थकीत वेतन व नियमित वेतन अदा करण्यात येऊन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य अनुदानित शाळांमध्ये समायोजित करण्यासंदर्भात उच्च माध्यमिक वाढीव पदांना शासनाची मान्यता प्रदान करून वेतन अदा करण्यात यावे. या बैठकीत शिक्षणमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.