Breaking News

‘आयसीसी’च्या नियमाला ‘बीसीसीआय’चा आक्षेप!

नवी दिल्ली
देशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या ट्वेन्टी-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावे, असा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे. “आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएल, बिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची परवानगी घेण्याचे सुचवले आहे. देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप, हरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. बीसीसीआयप्रमाणेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया या बलाढय मंडळांनाही हा नवा नियम पचनी पडलेला नाही, असा दावा या पदाधिकार्‍याने केला आहे. ते म्हणाले की, “भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील मंडळांनी ज्या खेळाडूंना आपल्या मध्यवर्ती करारात स्थान दिले नाही, अशा खेळाडूंसमोर निवृत्तीवाचून कोणताही पर्याय राहणार नाही. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंना आपल्या मंडळाकडून कोणतेही मानधन मिळत नाही, असे अनेक खेळाडू विविध लीग स्पर्धामध्ये खेळून पैसे कमावतात. या खेळाडूंवर या नियमामुळे अन्याय होणार आहे.