Breaking News

पूरग्रस्तांसाठी चारही बाजूंनी मदतीचा महापूर

मुंबई
कोल्हापूर आणि सांगलीमधल्या पूरग्रस्तांसाठी चारही बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मराठी कलाकारही पूरग्रस्तांसाठी पुढे सरसावले असून, मुंबई, ठाणे, पुणे इथे सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्रांवर वस्तू गोळा होत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळानंदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या दिवशी माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात सुमारे सत्तरहून अधिक लोकांनी जीवनावश्यक वस्तू नेऊन दिल्या. त्यात औषधे, कपडे, धान्य, चादरी, दुधाची भुकटी, कोरड्या खाद्यपदार्थांची पाकिटं यांचा समावेश होता. दोन ट्रक भरतील एवढ्या वस्तू पहिल्याच दिवशी गोळा झाल्या असून, ही मदत केंद्रं 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.
ठाण्यामध्ये गडकरी नाट्यगृह आणि घाणेकर नाट्यगृहात मदत केंद्रं सुरू आहेत. सुमारे दीडशे लोकांनी मदत देऊ केली आहे. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात आणि पिंपरी-चिंचवडच्या नाट्यपरिषदेच्या कार्यालयात तर पुण्यातही मदत केंद्रांवर मदतीचा ओघ सुरू आहे. मदत करणार्‍यांमध्ये सिने-नाट्य कलाकार, निर्माते, स्थानिक रहिवासी आणि रंगमंच कामगार यांचा समावेश आहे, अशी माहिती मदतकार्य समन्वयक रत्नकांत जगताप यांनी दिली. पूरग्रस्तांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी या मदतकेंद्रांवर जाऊन ती जमा करावी असं आवाहन केलं जातंय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवणार आहेत. मदत साहित्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, बिस्किट्स, धान्य, मीठ, तेल, मिल्क पावडर, फरसाण, जंतूनाशक औषधं, सॅनिटरी नॅपकिन्स, कपडे यांचा समावेश आहे. मदतीचं आवाहन करणारे व्हिडीओ सुबोध भावे, प्रसाद ओक यासारख्या कलाकारांनी पोस्ट केल्यामुळे स्थानिकांकडून मदत मिळणार्‍या मदतीत वाढ झाली, असं निर्माता-दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितलं. 

 व्हॅक्युम...चा मदतीचा प्रयोग
नाट्यसृष्टीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली आहे. अश्रूंची झाली फुलेच्या एका प्रयोगाचं उत्पन्न पूरग्रस्तांसाठी देण्याचं जाहीर झाल्यानंतर आणखीही काही नाट्यनिर्मात्यांनी त्यांचा कित्ता गिरवला आहे. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या एका प्रयोगाचं उत्पन्न पूरग्रस्तांना दिलं जाणार आहे. येत्या 18 ऑगस्टला दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये हा प्रयोग होणार आहे.