Breaking News

मुंबईतील केईएम रूग्णालयातील लिफ्ट म्हणजे मृत्यूचे सापळे?

मुंबई 
 मुंबईतील केईएम रूग्णालयाच्या बहुउद्देशीय इमारतीच्या लिफ्ट, या मृत्यूचे सापळे झाल्यासारख्या झाल्या आहेत. रूग्ण आणि नातेवाईकांसाठी ज्या लिफ्ट आहेत, त्या लिफ्ट कधीही कोणत्याही मजल्यावर बंद पडतात. यात लिफ्ट कोणत्या मजल्यावर आहे. याचा देखील अंदाज लागत नाही. विशेष म्हणजे 11 पेक्षा जास्त मजले असणार्‍या या इमारतीत, लिफ्ट अडकली, तर अलार्म फक्त लिफ्टच्या आत वाजतो, बाहेर याचा कुणालाही पत्ता लागत नाही.
या लिफ्ट अडकून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पाच ते सहा लिफ्ट एकाच वेळी नादुरूस्त बंद असल्याने, सुरू असलेल्या 2 लिफ्टमध्ये रूग्ण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी येणार्‍या जवळच्यांची गर्दी होते.
निदान या नादुरूस्त रडत खडत चालणार्‍या लिफ्टमध्ये एकाच वेळेस 15 पेक्षा कमी लोकांनी जायला हवं, हे सांगायला, किंवा त्यांना अडवायला कुणीच नाही. या लिफ्टविषयी शेकडो तक्रारी तक्रार पुस्तकात नोंद आहेत. लिफ्टमन तर शोधून सापडत नाहीत. किती आहेत नाहीत याचाही काही थांग पत्ताच लागत नाही.
हॉस्पिटल हे रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी असतं. पण केईएम रूग्णालयाच्या प्रशासनाने लिफ्टच्या बाबतीत एवढं दुर्लक्ष केलं आहे की, या लिफ्ट मृत्युचे सापळे असल्यासारख्याच आहेत. या लिफ्ट कधी कुणाचा जीव घेतील...याची परीक्षा न घेतलेलीच बरी.
अर्धा-अर्धा तास एकाच लिफ्टमध्ये पंधरा-पंधरा लोक अडकून पडतात, पण याबाबतीत कुणालाही कोणतंही, सोयरं सूतक राहिलेलं दिसत नाही. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येतं, तर कोणतीही दुर्घटना घडल्यास मुंबई महापालिकाच याला जबाबदार असणार आहे.
केईएम रूग्णालयाच्या या लिफ्ट टांगत्या तलवारीसारख्या आहेत, या कधी कुणाचा जीव घेतील, हे सांगता येत नाही, पण या रूग्णालयातील लिफ्टमध्ये प्रवास करणे, हा एक थरारक अनुभवच आहे.