Breaking News

आनंदऋषीजींनी समाजकार्याची प्रेरणा घालून दिली : दिलीप गांधी

अहमदनगर/प्रतिनिधी
“समाजात व्यापार, उद्योग व्यवसाय करताना समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नत्तीसाठी समाज कार्याची प्रेरणा आचार्य आनंदऋषीजी महाराजांनी घालून दिली आहे. या समाजप्रेरणेतून गेल्या 20 वर्षापासून  जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत. केंद्र शासनाच्या नव्याने आलेल्या आयुष्यमान भारत योजनेत गरजूंना शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळू शकेल. यासाठी आपण केंद्रीय स्तरावर आनंदऋषीजी हॉस्पिटलचा या योजनेत समावेश होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत’’, असे प्रतिपादन माजी खा.दिलीप गांधी यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या जन्मजयंतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे सुरु असलेल्या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरातील बालरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन माजी खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रायोजक कमलाताई मुनोत (निंभारीवाला), जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, माजी नगरसेवक किशोर बोरा, अजय ढोणे, गणेश मुळे, बालरोग तज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.किशोर कवडे, संतोष बोथरा, प्रकाश छल्लानी, सुभाष मुनोत आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रकाश छल्लानी यांनी केले.
याप्रसंगी संतोष बोथरा यांनी बालरोग विभागाची माहिती देताना सांगितले की, “मलेरिया, डेग्यू, टायफाईड, बाळ न रडल्यास, आकडी/फिट येणे इत्यादी आजारावर उपचार करण्याकरीता आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग परिपूर्णतेने सज्ज आहे. या विभागात 18 बेडचे सुसज्य व अत्याधुनिक व नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, तसेच 10 बेडचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्रणा येथे उपलब्ध आहे. तसेच सवलतीच्या दरात लसीकरणही येथे केले जाते. बालरोग तज्ञ डॉ.वैभवी वंजारे व डॉ.किशोर कवडे येथे उपलब्ध आहेत.’’
या शिबिरात डॉ.वैभवी वंजारे व डॉ.किशोर कवडे यांनी 110 बालरुग्णांची तपाणी करुन त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. सुभाष मुनोत यांनी आभार मानले. बुधवारी (दि.14) होमिओपॅथी शिबीर होणार आहे.