Breaking News

श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी योग्य उमेदवार : सुनिल गावसकर

मुंबई
विश्‍वचषक स्पर्धांपासून भारतीय फलदांजीला कायमच चौथ्या क्रमांकाची उणीव भासत होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सक्षम फलदांजाचा शोध घेण्यात येत होता. भारतीय फलंदाजीत अनेक प्रयोग केल्यानंतर देखील योग्य फलंदाज मिळत नव्हता. अखेर वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी केली. या सामन्यात अय्यारे 59 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत सुनिल गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकी खेळाच्या जोरावर 279 धावांपर्यंत मजल मारली. विराटला मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यरने 71 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. मोठ्या कालावधीनंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघात जागा मिळाली, या संधीचं सोन करत श्रेयसने संघातली आपली निवड सार्थ ठरवली. श्रेयसच्या खेळीवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर चांगलेच प्रभावित झाले आहेत. भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस योग्य उमेदवार असल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे. दुसर्‍या सामन्यात ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यातही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही, अवघ्या 20 धावा काढून तो कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. माझ्या मते ऋषभ पंत महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य आहे. त्या ठिकाणी तो त्याचा नैसर्गिक खेळ करु शकतो. जर शिखर-रोहित आणि विराट यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली, तर 40 व्या षटकानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं योग्य आहे. मात्र 30 व्या षटकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचं असल्यास पंतपेक्षा श्रेयस अय्यर योग्य उमेदवार आहे. सुनिल गावसकर  वाहिनीवर समालोचनादरम्यान बोलत होते. या मालिकेतला अखेरचा सामना मंगळवारी रंगणार आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधणार की भारत पुन्हा एकदा विजयी होऊन मालिका जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.