Breaking News

मला माणूस व्हावंसं वाटतं...!

     माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे नि:स्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरंच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी ? पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाकल्यास माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीच अखंड मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते आपला मित्र कोण आणि आपला शत्रू कोण आहे ते... मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. आपल्या विचारातूनच आपलं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे आपले लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, आपण सुंदर विचार करुन छान व्यक्तिमत्त्व घडवणं गरजेचं आहे.
     आज समाजात प्रत्येकाला काही ना काही बनायचे आहे. सभा संमेलनातून लोक मोठमोठ्या व्यासपीठांवरुन नुसते विचार मांडत आहेत. स्वतः महापुरुष बनू पाहत आहेत पण वर्तनानेच महापुरुष बनता येते. माणसाच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असला की दांभिकता वाढीस लागते. त्यामुळे आपला प्रवास सर्वात आधी आपण माणूस होण्यासाठी करु या. माणूसपण हरवलेल्या माणसाच्या कळपात माणूस म्हणून राहणारा संवेदनशील माणूस गुदमरल्याशिवाय राहणार नाही. चौकाचौकात आणि पावलोपावली माणुसकीचा खून होत असताना आणि स्वैराचार हाच आपला आचार आणि विचार म्हणून जपणारा माणसांचा काफिला बघितल्यावर मन उद्विग्न होतं आणि मग हेच बेेचैन मन आपसूकच म्हणून जातं... मला माणूस व्हावसं वाटतं !
     जागतिकीकरणामुळे भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु माणसातील माणूसपण जीवंत राहणे गरजेचे आहे. अनेक देशांत मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. तिथे गरिबातील गरीब माणसाला सर्व काही मिळाले तरी समाधान दिसत नाही. त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. अगदी पंचविशीतली मुले नैराश्यग्रस्त होत आहेत. याचे कारण मनुष्याला भौतिक प्रगतीसोबत आत्मिक प्रगतीही गरजेची असते. जगातील प्रत्येक देशात मराठी माणसाने यशस्वी कामगिरी बजावली आहे. यामुळे तेथील समाजजीवन व व्यवस्थेत त्याला मानाचे स्थान मिळाले आहे. जग पादाक्रांत करणार्‍या मराठी माणसाला देशासाठी व महाराष्ट्रासाठी खूप काही करण्याची इच्छा, अपेक्षा व आकांक्षाही आहे. महाराष्ट्र समृद्ध झाल्यास जगात लौकिक होईल. परंतु जागतिक होत असताना त्यातील मराठीपण शाबूत राहील, असा विश्‍वासही व्यक्त केला. ‘शोध मराठी मनाचा’ ही पर्वणी आहे. अशा संमेलनांतून तळागाळातून पुढे आलेल्यांचे विचार उलगडतात. आजूबाजूला प्रेरणा देणारी अनेक माणसे असतात.
     ’माणुसकी नाही ! माणुसकी नाही !’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहिली नाही ! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जीवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. माणूस मुळात श्रद्धावान आहे. जगण्यासाठी त्याला कोणत्यातरी श्रद्धा हव्या असतात; आधार हवा असतो. त्याचा जगण्याचा आधार काढला तर तो कोसळेल. या कोसळण्यापासून सुरक्षित राहता यावे, याकरिता सदाचाराचे मार्ग निर्माण करायला लागतात. सदाचार त्याच्या जीवनश्रद्धांचा आविष्कार आहे. सदाचाराच्या मार्गाने वळती होऊन डोळस श्रद्धेने जगणारी साधी, सद्वर्तनी, सत्यप्रिय, संस्कारित माणसे समाजाचे दिशादर्शक बनली. त्यांच्या आचरणातून समाजाला गती मिळाली आणि प्रगतीही झाली. समाजाच्या प्रगतीला आदर्शरुपाने सांभाळणारी प्रगतिप्रिय माणसं संस्कृतीचं संचित असतात. वंचितांच्या वेदनांनी व्यथित होऊन त्यांच्या जीवनात आत्मतेजाचा सूर्य आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रचंड सायास-प्रयास संवेदनशील विचारातून प्रकटलेला माणुसकीचा गहिवर होता. माणसांच्या जगात माणसांना माणसाचं जीवन नाकारणार्‍या प्रतिगामी विचारांच्या विरोधात समतेचा एल्गार होता. अविचारांची काजळी दूर करुन विवेकाची दिवाळी साजरी करु पाहणारा महात्मा फुलेंचा विचार द्रष्ट्या विचारवंताच्या जीवनात चिंतनाचा विषय ठरला. त्यांच्या प्रगतिप्रिय विचारांनी सार्वजनिक रुपात सत्यधर्माची ज्योत प्रदीप्त केली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मभान देण्याचा प्रयत्न माणुसकीधर्माचा साक्षात्कार होता.
     आपल्या भारतात अनेक युगपुरुष होऊन गेले, त्याचबरोबर नारीशक्तीनेही आपले अस्तित्व व सामर्थ्य जनमानसात उमटवलं. त्यातलेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले आदी महान व्यक्ती आहेत. या सर्वांनी स्वत: चंदनाप्रमाणे झिजून इतरांच्या आयुष्याला व इतरांना सुगंध दिला. आजही अशा विचारसरणीची माणसं आहेत; पण ती मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच. बाबा आमटे, मंदाकिनी आमटे; महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार घेऊन आरामात घरी बसू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. झिजणार्या जीवांना नवजीवन देण्याचं काम त्यांनी आपल्या श्रमातून केलं. याचं कारण अशाच माणसांना माणुसकीतील माणूसपण कळलं होतं. आणि हे जेव्हा प्रत्येक मानवाला कळेल तेव्हा माणुसकी हरवलेला या समाजात खरा माणूस म्हणून ओळखला जाईल.
     हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे, असं आपण बहुतांशी बोलत असतो. असं असतानाही काही अनुभव येतात त्यामुळे वाटतं की, संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाहीत. ’आधी माणुसकीचा जन्म आहे आणि माणुसकी हाच आपला धर्म आहे.’ आपण ज्या समाजात जन्मास आलो त्याचं आपण काहीतरी देणं लागतो, त्याची परतफेड म्हणून आपण समाजाची सेवा केलीच पाहिजे. कालबाह्य रुढीपरंपरा, अंधश्रद्धा याविषयी बोलताना तरुणाईचा आवाज अधिक धारदार होतो. सुशिक्षितपणाचा संबंध आधी माणुसकीशी आहे असं तरुण-तरुणींना वाटतं. समाजमनावर आजही अंधश्रद्धांचा खूप मोठा पगडा आहे. तो दूर करुन प्रत्येक गोष्टीकडे खुल्या मनानं पाहायला हवं असं त्यांना वाटतंय. कितीही आधुनिक झालो, तरी एखादी व्यक्ती माणूस म्हणून कशी वागते हे आजच्या जमान्यात खूप महत्वाचं आहे. कुणालाही जाणते-अजाणतेपणी दुखावणार्‍या प्रथा-परंपरा कितीही जुन्या असल्या तरी त्यांना सरळ तिलांजली देणंच मला व्यक्तिशः उचित वाटतं.
     जन्म जाहला जाईल वाया, सोसुनी ह्या अवकळा।
     भ्रूणहत्येचा मार्ग सोडूनि घ्या माणुसकीचा श्‍वास मोकळा॥
     ग्रामीण भागात वावरत असताना पदोपदी माणुसकीचा अनुभव येतो आणि त्या अनुभवाने माणूस प्रगल्भ बनतो. ’एकमेका सहाय करू अवघे धरु सुपंथ’ याची खरी प्रचिती ग्रामीण भागात दिसून येते. पैशाच्या बळावर सर्व काही मिळविता येते, या विचारातून माणुसकी मिळविण्याचा प्रयत्न असफल होतो कारण माणुसकी ही विकत मिळणारी वस्तू नाही.


- प्रदिप जानकर