Breaking News

पूरग्रस्तांच्या रोषामुळे मुख्यमंत्री माघारी

मदतीत राजकारण; जीवनावश्यक वस्तूंची खरेदीत लूट

सांगली / प्रतिनिधी
पुरानंतर पाचव्या दिवशी मुख्यमंत्री पूरग्रस्तांच्या बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी सांगलीत दाखल झाले; मात्र सांगलीतल्या सांगलवाडीत मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री सांगलवाडीत दाखल होताच उद्ध्वस्त पूरग्रस्तांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे घोषणाबाजी सुरू होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांना मदत देतानाही राजकारण केले जाते, याचे आणखी एक दुर्दैवी उदाहरण समोर आले आहे. भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी पूरग्रस्तांसाठी मदत पाठवून दिली; पण मदत साहित्यावर आवर्जून प्रचाराचे स्टिकर लावले. पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या अन्नधान्यावर हाळवणकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टिकर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्यावतीने ही मदत दिली गेली, असा उल्लेख या स्टिकरवर करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार मदतकार्यातही राजकीय स्वार्थ जपत असल्याची टीका होत आहे.
गेल्या सहा दिवसांपासून घरातली माणसे पुरामध्ये अडकून पडल्याने एका महिलेने टाहो फोडला; परंतु तिचा आक्रोश मदत करणार्‍यांपर्यंत पोहोचला नाही. शकिला शेख असे या पूरग्रस्त महिलेचे नाव आहे. सांगलीच्या संभाजीनगरमध्ये हरिदास सुपर मार्केटजवळ तिचा मुलगा, सून आणि नातवंडे गेल्या सहा दिवसांपासून घरात अडकले आहेत. त्यांना महापुरातून बाहेर काढा, असा आक्रोश ती जीवाच्या आकांताने करत आहे. आपत्कालीन व्यवस्था कोणत्याही तक्रारीची काही क्षणात दखल घेते, असा राज्य सरकारचा दावा असताना प्रत्यक्षात या महिलेच्या टाहोकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही.
पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सध्या दूध, पाणी, भाजीपाला आणि पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सांगलीकरांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाजी आणि दूध विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर उकळून ग्राहकांची लूट चालवली आहे.

स्टिकर छापण्यास उशिरामुळे मदतीला विलंब
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारने स्टिकर छापण्यात वेळ वाया घालवल्यानेच पूरग्रस्तांना दोन दिवस उशिरा मदत मिळाली, असा आरोप त्यांनी केला. लेकरं-बाळं उघड्यावर पडली असताना यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीपायी उपाशी माराल लोकांना, असे मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.