Breaking News

निर्दोष खेकडे !

चिपळूणजवळील तिवरे धरण फुटल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेले कारण अवघ्या महाराष्ट्रात चर्चिले गेले. पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना वर्षानुवर्षे अभ्यास करूनही या कारणाचा शोध लागला नव्हता! खरेतर आपल्या चुकांचे पांघरूण घालण्यासाठी इतके चांगले कारण कोठेही शोधून सापडले नसते. सावंत यांना ते सापडले. धरणे फुटण्यास खेकडेच कारणीभूत असल्याचे मंत्र्यांनी सांगितल्यानंतर खेकड्यांनाही आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली असावी! जगभरातील खेकड्यांना तिवरेच्या खेकड्यांना कोण अभिमान वाटला! आपल्या जमातीला आतापर्यंत परस्परांत नांग्या अडकवून मागे खेचणारी जमात म्हणून हेटाळणी करणार्‍यांना मंत्र्यांच्या विधानामुळे आम्ही मागे खेचत नाही, तर धरणही फोडून दाखवू शकतो, हे जगाला दाखवून दिले! खेकडे धरण फोडतात, या वृत्ताने महाराष्ट्रातील महसूल आणि पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले. चिपळूणचे तिवरे धरण फुटले, उद्या आपल्याकडची धरणए फुटायची, या भीतीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तिकडील धरणांचे स्ट्रक्चररल ऑडिट केले. त्याचा अहवाल पाटबंधारे खात्याने जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 77 प्रकल्प सुरक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांना खेकड्यांचा धोका नसल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांनी विशेष नमूद केले. तिवरे धरण फुटून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली. या अपघातात मृतांचा आकडा 24 वर पोहोचला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील जलसिंचन, पाटबंधारे प्रकल्प (मोठे, मध्यम व लघू), धरण, तलाव व इतर जलसाठ्यांची संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. आवश्यक दुरुस्ती करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश दिले होते. मॉन्सून कालावधीत अतिवृष्टीमुळे धरण, तलाव व इतर जलसाठ्यांना धोका असल्याची शक्यता आहे. धरणाच्या भिंतीला तडा जाऊन फुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या धरणांची संरचनात्मक तपासणी करून तत्काळ दुरुस्ती करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. पाटबंधारे विभाग आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता, मोठे पाटबंधारे प्रकल्प, मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्प, लघुसिंचन यांच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला होता. याबाबतचा ऑडिट रिपोर्ट जिल्हाधिकार्‍यांना सादर झाला असून जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कोकणातील तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचे विधान सावंत यांनी केले होते. मंत्र्यांच्या विधानानंतर यावर मंथन झाले. खेकड्यांमुळे धरण फुटू शकत नसल्याचे मत काही तज्ज्ञांनी मांडले. खेकड्यांमुळे धरण फुटतात, असे म्हणणे योग्य नाही. कारण खेकड्यांची बिळे फारशी खोलवर जात नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोठमोठ्या धरणांच्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असल्याने तिथे खेकडे असणे स्वाभाविकच आहे; मात्र खेकड्यांमुळे धरण फुटते, की नाही यावर अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही काहींनी मांडले. यावर संशोधनही होण्याची गरज आहे. खेकड्यांचा छोट्या कालव्यांना धोका असू शकतो; मात्र धरणांना नाही, असे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. खेकडे काही प्रमाणात पोखरू शकतात; परंतु त्याची खोली एक फुटापेक्षा जास्त असू शकत नाही. धरणांना गळती आहे का, भराव खचत तर नाही, दगडी धरणातून गळती होते का, माती धरणातून गळती होते का, हे तपासण्यात आले. या तपासणीनंतर धरण सुरक्षित असल्याचा शेरा या अहवालात मांडण्यात आला आहे. धरणफुटीच्या घटना तशा अपवादात्मक. पूर्वी अशा घटनांना मानवी चुकांपेक्षा निसर्ग जास्त जबाबदार असायचा. निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नांमुळे आता निसर्ग वारंवार बदलायला लागला आहे. पावसाची सरासरी तीन हजार मिलीमीटर असेल, तर अतिशय कमी काळात म्हणजे काही तासांत पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो. अशा वेळी मानवी जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. धरण फुटले, तर मग विचारायलाच नको. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राची तुलना केली, तर कोकणात मातीची धरणे बांधणे चुकीचे आहे. त्याचे कारण तिथे पाण्याला उतार जास्त असतो. पावसाची सरासरी जास्त असते. तरीही तिथे मातीची धरणे बांधण्यात आली आहेत. हा उघडउघड नागरिकांच्या जीविताशी खेळ आहे.
मातीच्या धरणाच्या बांधकामात काळी माती वापरावी लागते. काळी माती पाणी धरून ठेवते. मुरूम आणि तांबडी माती पाणी धरून ठेवत नाही. अशी माती वापरली, तर धरण फुटण्याचा धोका जास्त असतो.
धरणाच्या बांधकामाची निविदा काढताना त्यात काळ्या मातीचा वापर करण्याची अट असते. ही माती कोकणात उपलब्ध नसते. त्यामुळे ती घाटावरून आणण्यासाठी वाहतुकीच्या खर्चाची तरतूद गृहीत धरून निविदा काढलेली असते; परंतु काम घेणारे ठेकेदार सह्याद्रीच्या पूर्वेकडून माती आणण्याची तसदी घेत नाहीत. स्थानिक जांभळ्या, तांबड्या मातीचा धरणाच्या भिंतीत समावेश करतात. माती वाहतुकीचा खर्च वाचल्याने तो नफ्याच्या रुपात ठेकेदाराच्या खिशात जातो. त्यातही आता आमदारच ठेकेदार झाल्याने त्यांनी कोणती माती वापरली, हे अधिकारी पाहत नाहीत. खरेतर अधिकार्‍यांचाही तो दोष आहे. काही कोटींसाठी कितीतरी लोकांच्या जीविताशी आणि वित्तीय मालमत्तेशी आपण खेळत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येत असेल, तर इतरांचे काय होते, त्यापेक्षा माझा खिसा गरम होतो ना, याला ते जास्त महत्त्व देत असावेत. धरणांच्या सुरक्षिततेची जेवढी जबाबदारी ठेकेदाराची असते, तेवढीच किंबहुना त्याहून जास्त जबाबदारी अधिकार्‍यांची असते. अधिकारीही सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य देत आहेत. तिवरे धरणाला पडलेले भगदाड आणि त्यानंतरचे छायाचित्र बारकाईने पाहिले, तर त्यातून तीन गोष्टी स्पष्ट दिसतात. एकतर तिथे मातीचे धरण बांधायलाच नको होते. या धरणासाठी वापरलेली माती ही तांबडी आहे. भगदाड पडल्यानंतर झालेली दुरुस्ती लक्षात घेतली, तर दुरुस्तीसाठीही मुरूम वापरल्याचे दिसते. काळ्या मातीऐवजी स्थानिक मातीचा वापर करण्यात आला आणि तेच धरण फुटीला कारण ठरले. तिसरे आणि अतिशय महत्त्वाचे कारण धरणाची भिंत दगडाची असेल, तर जिथे तिचे बांधकाम संपते आणि पुढे मातीची भिंत आणि दगडाचे पिचिंग सुरू होते, तिथला सांधा जर व्यवस्थित बांधला नाही, तर तिथे धरण फुटू शकते. धरण फुटीची ही कारणे आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटण्याला उंदरांना जबाबदार धरले. अधिकारी आणि ठेकेदारांना वाचवण्यासाठी त्या वेळी महाजन यांनी काढलेली क्लृप्ती आता जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनीही वापरली आहे. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले, असे त्यांनी सांगितले आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांची तळी उचलली. शिवसेना आणि भाजपत याबाबत किती एकवाक्यता आहे, हे ही दिसले; परंतु पाटबंधारे खात्याने आता खेकड्यांना निर्दोष ठरविल्यामुळे हे नेते उघडे पडले! पाटबंधारे खात्याच्या या अहवालामुळे आता किमान खेकड्यांवर आरोप करण्याचे कारण तरी राहिले नाही.