Breaking News

विरोधकांची सत्ता लालसेपोटी भाजपशी हातमिळवणी : सुजात आंबेडकर

अहमदनगर/प्रतिनिधी
“राज्यात प्रकाश आंबेडकर व असुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली आहे. लोकसभेच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली, याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसे विरोधकांनी सत्ता लालसेपोटी भाजपाशी हातमिळवणी सुरू केली आहे. त्यांनी आपली नीतीमूल्ये पूर्णपणे विकली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत जनता अशा दलबदलू विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल. दलितांवरील अत्याचार आजही सुरूच आहेत. वंचित बहुजन आघाडीच त्यांना न्याय देईल’’, असे प्रतिपादन युवक आघाडीचे अध्यक्ष सुजात प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी व एमआयएम, तसेच युवक आघाडी नगर दक्षिणच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात आंबेडकर बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष अमित भुईगळ, दिशा शेख, सचिन माळी, जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, डॉ. परवेज अशरफी, आम्रपाली भडांगे, अरुण जाधव, ‘बारा बलुतेदार’चे प्रतिनिधी विनय देवतरसे, दिलीप साळवे, सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, नितीन घोडके, बाळासाहेब गायकवाड, अनिल पाडळे, अंकुश भैलुमे, अजय चव्हाण, अशोक जाधव, शेखर घायतडक, विजय मगर, अजय सोनवणे, सचिन बडेकर, रूपेश बनसोडे, सागर चाबूकस्वार, प्रवीण जाधव, संदीप गायकवाड, जीवन कांबळे, सागर ठोकळ, योगेश थोरात, संदीप जाधव, नितीन अवचर, सिद्धार्थ घोडके आदी उपस्थित होते.
आंबेडकर पुढे म्हणाले, “विरोधी पक्षनेते यांनी आम्हाला बी टीम समजले आहे. परंतु आज त्यांचीच बी टीम होऊन बसली आहे. मुलगा व ते भाजपात असले, तरी कुटुंबातील काही व्यक्ती काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी अवलोकन करावे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठे यश मिळेल’’, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे म्हणाले, “राज्यात सत्तेसाठी विरोधकांची होणारी दमछाक जनता पाहत आहे. अनेकजण पक्षप्रवेश करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीने अनेकांचे धाबे दणाणले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठे यश मिळवू.’’
सागर भिंगारदिवे म्हणाले, “युवक आघाडीकडे युवकांचा कल वाढत असून, सुजात आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण परिश्रम घेत आहोत. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून आणू. सर्वांना बरोबर घेऊन काम करू.’’
अमित भुईगळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी अक्षय भिंगारदिवे, आकाश जाधव, शंकर गायकवाड, विजय गायकवाड आदींनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.