Breaking News

‘शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती’

रामदास फुटाणे यांचे राजकारण्यांना चिमटे

ठाणे
कोणताही पक्ष हा धुतलेल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे. ‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’ असे विडंबन काव्य करत विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मंगळवारी राजकारण्यांना चिमटे घेतले. आचार्य अत्रे यांच्या 121व्या जयंतीनिमित्त रामदास फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य करत फुटाणे यांनी नेते, साहित्यिक आणि पत्रकार आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवल्या. कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे काही कळत नाही. काही सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसर्‍या पक्षात असतात. आज आचार्य अत्रे असते तर सगळ्यांना झोडपून काढलं असतं, असं फुटाणे म्हणाले. दरम्यान, देशातील अस्थिरतेमुळे जात, धर्म मजबूत झाले आहेत. आर्थिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. खर्‍या अर्थाने आज अत्रेंच्या लेखणीची गरज आहे, असंही फुटाणे म्हणाले.