Breaking News

घनकचरा विभागप्रमुख पैठणकरांचा नियोजनशून्य कारभार : नगरसेवक श्याम नळकांडे

अहमदनगर/प्रतिनिधी
“घनकचरा विभागप्रमुख पैठणकर यांचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे घनकचरा विभागाचा पूर्णपणे बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पैठणकर यांना निलंबित केले. तरी महिन्याभरात त्याच ठिकाणी त्यांची नेमणूक करून घेतात. ही नेमणूक आर्थिक हित साधून केली गेली आहे हे स्पष्ट दिसून येते. फक्त एकच महिन्यात निलंबित कालावधी झाल्यामुळे अधिकार्‍यांवर प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नाही. त्यामुळे त्याचे निलंबन करून भविष्यात घनकचरा व्यवस्थापन विभागात कधीही विभागप्रमुख म्हणून नेमणूक करू नये’’, या मागणीचे निवेदन नगरसेवक श्याम नळकांडे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महानगरपालिकामध्ये घनकचरा व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचे विभाग आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता, दैनंदिन साफसफाई, कचरा संकलन व वाहतूक, कचरा डेपोपर्यंत करणे, सार्वजनिक शौचालय, मेलेल्या जनावरांची वाहतूक व विल्हेवाट लावणे, स्वच्छतेसंदर्भात अन्य कामेही या विभागाच्या 1000 ते 1200 सफाई कर्मचार्‍यामार्फत स्वच्छता निरीक्षक यांच्या देखरेखीखाली केली जातात. परंतु घनकचरा विभागप्रमुख पैठणकर यांचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे घनकचरा विभागाचा पूर्णपणे बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पैठणकर यांना निलंबित केले. परंतु एक ते दीड महिन्यातच मनपा आयुक्त यांनी त्याच्यावर कृपादृष्टी दाखवून पुन्हा घनकचरा विभागप्रमुख पदी नेमणूक दिली.
वास्तविक नियमाच्या विरुद्ध जाऊन कोणाच्या आदेशाने आस्थापना विभागप्रमुख यांनी उपायुक्त यांच्या मान्यतेने त्याच ठिकाणी नेमणूक दिली. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील या नियमान्वये निलंबित अधिकार्‍याला विभागीय चौकशी पूर्ण न करता त्याच ठिकाणी नेमणूक करता येत नाही. तसेच जनसंपर्क होणार नाही अशा ठिकाणी बदली करणे असा नियम आहे. ही बाब माहीत असूनही पैठणकरची परत त्याच ठिकाणी नेमणूक देऊन पैठणकर यांना पुरावे नष्ट करण्याची संधी दिली आहे, ही गंभीर बाब आहे.
पैठणकर यांच्या काळात अनेक घोटाळे झाले. अनेक कामे करण्यात त्यांनी उदासीनता दाखवली. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगर शहराचा नंबर अतिशय खाली गेला. इतर कारणे जसे-सावेडी कचरा डेपोला सतत दोन - तीन वेळा आग लागणे, कुठलेही आग प्रतिबंधक उपाय न करणे, सिक्युरिटी गार्ड न ठेवणे, हरित लवादाने महापालिका 50 लाख रुपयाचा दंड केला. महापालिकेची राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात मानहानी झाली. अशा अनेक कारणांमुळे पैठणकर यांना निलंबित केले गेले होते, परंतु त्यांना परत सेवेत रुजू करून परत तेच कारनामे करण्याची त्यांना संधी दिली आहे.
जी कामे पूर्ण करण्यात पैठणकरांनी वर्षभराचा विलंब केला व निविदा प्रक्रिया लांबविल्या ती कामे मेहेत्रे यांनी एका महिन्यात पूर्ण केली. प्लॅस्टिक जप्तीचा धडाका लावला, घनकचरा व्यवस्थापना यापूर्वी दांडगा अनुभव असल्याने त्यांनी कचरा संकलन आदी कामे नियोजनबद्धरीत्या केली. त्यामुळे काम करणार्‍या अधिकार्‍यालाच या पदावर ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार घनकचरा विभागप्रमुख हे पद प्रकल्प अभियंता किवा पर्यावरण अभियंता यांच्या अखत्यारीत असते. त्यामुळे तिथे प्रकल्प अभियंता नेमावा, तसेच पैठणकर यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले.