Breaking News

कोल्हापूर, सांगलीत महापूराचा विळखा कायम

पूरग्रस्तांसाठी 441 तात्पुरती निवारा केंद्रे सुरू

कोल्हापूर
पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला अजूनही महापूराने वेढले असून, पाणी संथगतीने कमी होतांना दिसून येत आहे. बचावकार्यांचे काम अजूनही वेगाने सुरू असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत घर, दुकाने, ऑफिसमध्ये शिरलेले पाणी ओसरल्यानंतर त्या भागाची स्वच्छता करण्यासाठी धडपड सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. कुरुंदवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर आदी भागामध्ये हेलिकॉप्टरमधून फूड पॉकेटसचे वाटप झाले.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील 4 लाख 66 हजार 963 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  या नागरिकांसाठी 441 तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 33 पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण 111 बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
शिरोळ तालुक्यातील 43 गावे पुरांनी बाधित झाली असून तब्बल एक लाख 55 हजार 186 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण केले आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश भाग अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील जनजीवन अजूनही विस्कळित आहे.
कोल्हापूर शहरात नागरी वस्तीत शिरलेले पाणी संथगतीने उतरत आहे. शाहूपुरी गवत मंडई येथील रस्त्यावरून दुपारपासून वाहतूक सुरू झाली. मात्र शाहूपुरी सहावी गल्ली, कुंभार गल्ली अजूनही पाण्याखाली आहे. विल्सन पुलावरील पाणी ओसरले तरी सहाव्या व पाचव्या गल्लीत आणि व्हीनस कॉर्नर परिसरातील अजूनही पाणी असल्यामुळे वाहतूक बंद ठेवली आहे. कदमवाडी, जाधववाडी, दुधाळी, कसबा बावडा, शाहूपुरी, सुतारवाडा,जयंती नाला काठावरील घरे मोठ्या संख्येने बाधित आहेत.  जिल्ह्यात अजूनही 107 बंधारे पाण्याखाली आहेत. 87 प्रमुख जिल्हा मार्ग महापुराने बंद झाल्यामुळे जिल्हातंर्गत वाहतूक ठप्प आहे. तालुक्यातील नऊ गावे पूर्णपणे पाण्यांनी वेढली आहेत. दरम्यान पंचगंगा पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. दिवसभरात साधारणपणे एका फुटांनी पाण्याची पातळी खालावली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधाराम येथे पाणीपातळी 50 फूट सहा इंच इतकी होती. दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ सहा इंचांनी पाणी उतरले. सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी 49 फूट 10 इंच होती.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये 105 बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 तर सांगली जिल्ह्यात 51 
पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत. पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित 
तालुक्यातील 2 लाख 47 हजार 678 तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील 1 लाख 73 हजार 89 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 208 तर सांगली जिल्ह्यात 108 तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. 108 गावांमधील 13 हजार 500, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 5 गावांमधील 3 हजार 894, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 58 गावांमधील 2 हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील  सात तालुक्यातील 12 गावांमधील 687, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 60 गावांमधील 3 हजार,सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील 18 गावांमधील 490 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 70 तालुके बाधीत झाले आहेत.