Breaking News

सेल्फी भोवली: महाजनांवर सर्वंच स्तरातून टीका

कोल्हापूर / प्रतिनिधी
एकीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोकांच्या डोळ्यातले पाणी सुकले नाही; पण त्याचवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन पूर पर्यटनात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले गिरीश महाजन सेल्फी व्हिडिओला हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत.
कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाजन बोटीने निघाले होते. या वेळी एका कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडिओमध्ये महाजन हसून दाद देताना दिसत आहेत. किमान परिस्थितीचे गांभीर्य राखण्याचे भान कोणालाही राहिले नाही.
महाजन यांच्या असंवेदनशीलतेचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला. मुंडे यांनी ट्वीट केले, की सत्ताधार्‍यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येते. मंत्री महोदय मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटत नाहीस या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का, असा सवाल केला.
जयंत पाटील म्हणाले, की नुकसान झाले असताना मंत्री हसत, खिदळत असतील, तर ते आपले दुर्दैव आहे. सत्तेत असलेल्या लोकांना काय शहाणपण शिकवायचे. आजही इथे पालकमंत्री आलेले नाहीत. सरकारने मदतीचा हात दिलेलाही दिसत नाही. ढिसाळ कारभाराला लोक वैतागले आहेत. मदत करण्याऐवजी असे फिरून स्वत:ची जाहिरात करणे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांना आपले विश्‍वासू सहकारी पाठवण्याऐवजी काही कार्यक्षम मंत्री पाठवायला हवे होते. हा विषय आमदार पळवण्याचा नाही. ज्याप्रमाणे रोड शो करत त्याप्रमाणे नवी वॉटर शो करण्याची पद्धत मंत्रीमहोदयांनी सुरू केली आहे. डिझास्टर टूरिजमची नवी व्याख्या त्यांनी तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काही सीरिअस मंत्री आहेत, त्यांना या कामात पाठवायला हवे होते, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना लक्ष्य केले.

असंवेदनशीलतेचा कळस
महापुरात 25 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी, हजारो विस्थापीत व अब्जो रुपयांचे नुकसान झाल्यावरही तुम्हाला नाचायला व हसायला सुचतेच कसे? असा प्रश्‍न महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.