Breaking News

ममता धरणार काँग्रेसचा हात!

भाजपला रोखण्यासाठी तृणमूल, काँग्रेस एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील नेतेमंडळी आपल्या पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे तृणमुल काँग्रेससहित इतर पक्ष चिंतेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करू शकतात.

संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या अखेरच्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तृणमूलचे लोकसभेतील नेते कल्याण बॅनर्जी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या वेळी राहुल यांनी राज्यात मुख्य विरोधी पक्ष म्हणून ममता दीदी कोणाला पाहू इच्छिता, असा सवाल केला होता. राहुल यांनी काँग्रेस आणि तृणमूलदरम्यान समन्वय वाढवण्याची गरज असल्याचेही म्हटले होते. त्यावर आता दोन्ही पक्षांचे प्रमुख ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हेच अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

राहुल आणि कल्याण बॅनर्जी यांच्या भेटीशिवाय याच मुद्द्यावर तृणमूलचे लोकसभेतील सुदीप बंडोपाध्याय आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यातही अनौपचारिक चर्चा झाली आहे. यापूर्वी दोन्ही पक्ष एकत्र लढले आहेत. 2009 मधील लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि तृणमूलने एकत्र लढवली आहे. तसेच 2011 मध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती; मात्र, 2013 मध्ये दोन्ही पक्ष वेगळे झाले. पुन्हा 2021मध्ये एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलला राज्यात 43.3 टक्के मते मिळाली. भाजपला 40.3, डाव्या पक्षांना 6.3 टक्के तर काँग्रेसला 5.6 टक्के मते मिळाली. तृणमूलला 22 जागा मिळाल्या. 2014 मध्ये 34 जागी त्यांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे 2014 मध्ये भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत तब्बल 18 जागांवर विजय मिळविला. डाव्या पक्षांनातर खातेही उघडता आले नाही. काँग्रेसने दोन जागी विजय मिळवला.