Breaking News

पूरग्रस्तांच्या घरातून चोरी करणार्‍यांची टोळी सक्रिय

कोल्हापूरातून तीन लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर
महापुरामुळे स्थलांतरित झालेले लक्ष्मीपुरी येथील अमोल मनोहर कांबळे यांचे दुसर्‍या मजल्यावरील घर फोडून चोरट्यानी 14 तोळे दागिने, चांदीच्या वस्तू, 18 हजाराची रोकड असा सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. कसबा बावड्यात दोन दिवसांपूर्वी माळी कुटुंबात सुमारे 80 तोळे सोने चोरीला गेल्याचे समजते. महावीर कॉलेज व न्यू पॅलेस परिसरात पूरामुळे अनेक फ्लॅट बंद आहेत. मदतीच्या बहान्याने कार्यकर्त्यांच्या रुपात जाणारी चोरांची टोळी प्लॅट फोडत असल्याच्या घटना वाढत आहेत.यापार्श्‍वभूमीवर पोलीसांनी गस्त वाढविली आहे.
पूरग्रस्त भागातील चोरी, घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी करवीरसह शहरातील चारही पोलिस ठाण्यातील यंत्रणेला रात्र-दिवस गस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यालयातील राखिव पोलिस दलाचा फौजफाटाही ठिकठिकाणी रवाना करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. लक्ष्मीपुरी येथील जुना कांदा बटाटे मार्केट परिसराला महापुराच्या पाण्याने रात्रीत वेढा दिल्याने अनेकांची घरे पाण्याखाली गेल्याने नागरिक मुलाबाळासह घाईगडबडीत संसार उघड्यावर सोडून बाहेर पडले. अमोल कांबळे यांच्या घरालाही पाण्याचा विळखा पडल्याने या कुटुंबियांचे श्रमिक हॉलमध्ये स्थलांतर करण्यात आले. सायंकाळी कांबळे यांच्या दुसर्‍या मजल्यावरील घराचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आले. अमोल,त्याचा भाचा निलेश व आईने घराकडे धाव घेतली. हॉल, बेडरूम तसेच स्वयंपाक खोलीतील सर्व साहित्य विस्कटून टाकण्यात आल्याचे दिसून आले.
तिजोरीतील साहित्यही इतरत्र विस्कटण्यात आले होते. कप्प्यातील दागिन्यांची पर्स व डब्यातील 18 हजाराची रोकड चोरट्यानी पळवून नेल्याचे निदर्शनास आल्याने सार्‍यांना धक्का बसला. सोनसाखळी, गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, मुलांच्या अंगठ्या असा 14 तोळ्याचे दागिने, चांदीची भांडी,वस्तूसह रोकड चोरट्यानी लंपास केली. पूरग्रस्ताच्या घरावरच चोरट्यानी डल्ला मारून तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याची बातमी समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.
या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंतराव बाबर,राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महापुराने अनेक घरांना वेढा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवडा खंडीत करण्यात आला आहे.