Breaking News

‘मनसे’च्या वतीने आयुक्तांना स्मरणपत्र

अहमदनगर/प्रतिनिधी
खड्डेमय रस्त्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असताना सावेडी उपनगरातील रस्त्याची दुरुस्तीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. अनेक दिवस उलटून देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्मरणपत्र देण्यात आले.
यावेळी ‘मनसे’चे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, परेश पुरोहित, अविनाश क्षेत्रे, सुनील धीवर, नीलेश खांडरे आदी उपस्थित होते.
सावेडी उपनगरातील रस्त्याच्या खड्ड्यांची डागडुजी करून डांबरीकरण होण्यासंदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु आज दोन महिने होऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेचे सर्व कर भरुन देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या 8 दिवसात या भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी करुन डांबरीकरण न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.